दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । बारामती । घाडगेवाडीत संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे यांच्या घरी यंदाच्या वर्षी परिवाराच्यावतीने माँसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रूपात महालक्ष्मीचा देखावा उभ्या स्वरुपात साकारला असून या परिवारने पुस्तकरूपी आरास उभी करुन पुस्तके वाचण्याचा संदेश रूजविण्याचा प्रयत्न केला आहे. तुषार तुपे यांच्या पत्नी मधुरा तुपे यांनी अन्य पारंपरिक गौरी सजावटीला पूर्णपणे बगल देत दिन दुबळ्या रयतेला अत्याचाराच्या जुलमी विळख्यातून बाहेर काढणाऱ्या राजमाता मॉंसाहेब जिजाऊ आणि पिढ्यानपिढ्या अज्ञानाच्या अंधारकोठडीत काळवंडलेल्या अशिक्षित रयतेला विशेषतः महिलांना शिक्षण रुपी अमृत देऊन त्यांच्या येणाऱ्या सर्व पिढ्या प्रकाशमय करणाऱ्या सावित्रीमाई फुले ह्याच खऱ्या अर्थाने लक्ष्मी मानुन यांच्या रूपात गौरी उभ्या केल्या आहेत. हळदी कुंकवासाठी येणाऱ्या महिलांना तुपे यांनी प्रबोधनाची पुस्तके भेट दिली आहेत.
विविध प्रबोधनात्मक पुस्तके व समाजातील विविध ज्वलंत समस्यांविषयी सकारात्मक संदेश देऊन गौरी सजावट करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. आरास उभी करण्यासाठी तुपे परिवारातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.