
-
ही निवडणूक रामराजे वि. रणजितसिंह नसून जनतेच्या विकासाची लढाई
-
पाणीपुरवठा केवळ पूर्ण दाबानेच नव्हे, तर महिलांच्या सोयीच्या वेळेत व्हावा
-
शासकीय योजनांचे फॉर्म भरण्यापासून कागदपत्रांपर्यंत गरिबांना मदत करणार
स्थैर्य, फलटण, दि. 23 नोव्हेंबर : “फलटण नगरपालिकेची ही निवडणूक वरकरणी जरी रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी दिसत असली, तरी आमच्यासाठी ही खरी लढाई फलटणच्या विकासाची आहे. हे घराण्यातील युद्ध नसून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे,” असे प्रतिपादन सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक २ मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या २७ जणांच्या टीमला पूर्ण पाठिंबा दर्शवत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
निधीचे योग्य नियोजन हवे
विकासाच्या मुद्द्यांवर बोलताना जिजामाला नाईक निंबाळकर म्हणाल्या, “शहराच्या विकासासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर निधी आणण्यात कधीही कमी पडणार नाहीत, पण त्या निधीचे योग्य नियोजन होणे तितकेच महत्त्वाचे आहे. रस्ते करताना केवळ काम उरकणे नव्हे, तर तांत्रिक बाबी तपासून आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन कामे झाली पाहिजेत. रस्त्याचे फिनिशिंग चांगले असावे आणि दैनंदिन जीवनात अडथळा येऊ नये, याकडे आमचे विशेष लक्ष असेल.”
पाणीपुरवठा: महिलांच्या सोयीची वेळ
शहरातील पाणीपुरवठ्याबाबत त्यांनी विशेष आग्रह धरला. त्या म्हणाल्या, “पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना चढ-उतार आणि तांत्रिक बाबींचा (Slope maintenance) विचार करून पाईपलाईनचे काम केले जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी केवळ पुरेशा दाबानेच मिळून चालणार नाही, तर ते महिलांच्या सोयीच्या वेळेत मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही असू.”
केवळ माहिती नको, कागदपत्रांत मदत हवी
महिलांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी सांगितले की, “पाण्याच्या सोयीसोबतच महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच, नगरसेवकांनी केवळ शासकीय योजनांची माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता, त्या योजनांचे ऑनलाइन फॉर्म भरण्यापासून ते कागदपत्रांची पूर्तता करण्यापर्यंत गोरगरिबांना मदत करावी, हे आमचे पहिले टार्गेट असेल.”
येत्या ३ डिसेंबरनंतर शहरात नक्कीच बदलाचे काम दिसेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रचार सभेला प्रभागातील महिला उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

