दैनिक स्थैर्य । दि. ३० डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण नगरपालिका कडून शहरांमध्ये असणाऱ्या अतिक्रमणांवर आज सकाळपासून जेसीबी चालवण्यात आलेला आहे. यामध्ये विविध अतिक्रमणे नगरपालिकेच्या माध्यमातून काढण्यात आली असून आगामी काळामध्ये सुद्धा शहरामध्ये असणारे सर्वच अतिक्रमणे जमीनदोस्त करावी, अशी मागणी फलटण शहरवासीयांमधून होत आहे.
फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी फलटण शहरातील अतिक्रमणे काढण्याच्या बाबत ठोस भूमिका घेत शहरामधील अतिक्रमणे काढण्याचा निर्धार केला असल्याचे यामधून दिसून येत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात पुन्हा एकदा शहरामध्ये करण्यात आलेली आहे. यापूर्वी नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी प्रसाद काटकर विराजमान होते; त्यावेळी फलटण नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आलेली होती. या मोहिमेमध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे काम करण्यात आलेले होते परंतु त्यानंतर त्यांची बदली झाल्याने ही मोहीम थंडावली होती.
फलटण नगरपरिषद हद्दीतील आरक्षित जागा, पडीक जागा, गायरान जमीनी, शासकीय जमीनी नगरपरिषद मालकीच्या जागेवर, रस्त्यावरील अतिक्रमणे यांचेवर कार्यवाही करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि शासनाने आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने फलटण नगरपरिषद व तहसिल कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटाओ मोहिम सुरु करणेत आली. या मोहिमेत रस्त्यावरील व वाहतुकीस अडथळा निर्माण होणारी अतिक्रमणे, जाहिरात फलक, शासकीय जमीनीवरील अतिक्रमणे काढणेत आली आहेत. शहरातील बहुतांश नागरीकांनी अतिक्रमणे, जाहिरात फलक, पत्राशेड स्वतः हटवुन नगरपरिषदेस सहकार्य केले. यापुढे नागरीकांनी अशाच प्रकारे स्वतः अतिक्रमणे काढुन घेणेत यावी, असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी केलेले आहे.
शहराचे मोठया प्रमाणावर विद्रुपीकरण झालेचे बरेच नागरीकांच्या तक्रारी आल्याने तसेच स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत शहर सौंदर्यीकरणांस प्राध्यान्य असल्याने शहराचे विद्रुपीकरण थांबविणे करीता अतिक्रमण हटावो माहिम मोठया प्रमाणात राबविणेचा मानस आहे. या मोहिमेमध्ये फलटणचे तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड नगर अभियंता पंढरीनाथ साठे, रोहित पाटील, विनोद जाधव, सुरेंद्र काळेबेरे यांच्यासह फलटण नगर परिषदेमधील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आलेली आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये पोलीस विभागाच्या माध्यमातून नगरपरिषदेला मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.