
दैनिक स्थैर्य । दि. २१ नोव्हेंबर २०२२ । फलटण । सातारा येथील ज्येष्ठ साहित्यिक जयवंत गुजर यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेच्यावतीने ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
जयवंत गुजर हे गेली सत्तरहून अधिक वर्षे यशस्वी लेखक व पत्रकार म्हणून मराठी वाचकांना परिचित आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सांगण्यावरून पत्रकारितेचे ‘व्रत’ स्वीकारुन जयवंत गुजर यांनी सातत्याने ‘स्तंभलेखन’ करुन सामान्य जनतेची दु:खे वेशीवर मांडली आहेत. दैनिक ऐक्य (सातारा) मधून सलग 34 वर्षे ‘सूर्यफुले’ या स्तंभामध्ये लेखनाचे काम त्यांनी केले आहे. आजवर विविध 10 चरित्रांचे लेखनही त्यांनी केले असून त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून म.सा.प.फलटण शाखेच्यावतीने त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’चे वितरण दि.26 नोव्हेंबर 2022 रोजी फलटण येथे ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलना’त महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक मधुकर भावे यांच्या हस्ते होणार असल्याचे, म.सा.प.शाखा अध्यक्ष शांताराम आवटे यांनी सांगितले.