
स्थैर्य, फलटण, दि. १७ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १० (ओबीसी महिला राखीव) मधून जयश्री रणजीत भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (खासदार गट) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी काल (दि. १६) निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्याकडे आपला अर्ज सुपूर्द केला.
जयश्री भुजबळ यांनी २०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीतही याच प्रभागातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशाचा मान राखत आणि पक्षावरील निष्ठेपोटी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. पक्षाशी असलेली ही निष्ठा आणि त्यागाची भूमिका लक्षात घेऊन, यावेळी त्यांनाच संधी मिळावी, अशी आग्रही मागणी खासदार गटातील कार्यकर्त्यांकडून होत होती.
काही दिवसांपूर्वीच जयश्री भुजबळ यांनी उमेदवारीसाठी मुलाखत देताना आपल्या शेकडो समर्थकांसह जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. यावेळी उपस्थित असलेली महिलांची लक्षणीय संख्या आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, खासदार गटाकडून (महायुती) त्यांचे नाव आघाडीवर होते.
जयश्री भुजबळ यांचे पती रणजीत भुजबळ हे आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरात सक्रिय आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यात आणि खासदार गटाची विचारधारा पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. भुजबळ दांपत्याचा प्रभागातील थेट जनसंपर्क आणि विकासकामांसाठीची तत्परता ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.
प्रभाग क्रमांक १० मध्ये ओबीसी महिला आरक्षण असल्याने ही लढत चुरशीची होणार आहे. मात्र, जयश्री भुजबळ यांचा थेट जनसंपर्क, महिला वर्गाचा मोठा पाठिंबा आणि २०१६ च्या त्यागाची पार्श्वभूमी यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यांच्या अधिकृत उमेदवारीमुळे त्यांनी प्रभागातील विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

