
फलटण तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा महायुतीचा प्रचार शुभारंभ उद्या पाडेगाव येथे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती. विधानसभा आणि नगरपालिकेपाठोपाठ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आता झेडपीसाठी लावली ताकद. वाचा सविस्तर…
स्थैर्य, फलटण, दि. 22 जानेवारी : फलटण तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली असून, उद्या (दि. २३) भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महायुती) च्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ होणार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख उपस्थितीत पाडेगाव (ता. फलटण) येथे सकाळी ९ वाजता प्रचाराचा नारळ वाढवला जाणार आहे.
रणजितसिंहांची ‘हॅट्ट्रिक’साठी फिल्डिंग!
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी फलटणच्या राजकारणात सध्या चांगलीच हवा निर्माण केली आहे. विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी लावलेली ‘फिल्डिंग’ विरोधकांना घाम फोडणारी ठरली आहे. मागील वर्षीची विधानसभा निवडणूक आणि नुकतीच झालेली नगरपालिका निवडणूक यांत यश मिळवल्यानंतर, आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. ‘तालुक्यात परिवर्तन’ घडवण्यासाठी त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, उद्याच्या शुभारंभाने त्याची ललकारी दिली जाणार आहे.
महायुतीचे शक्तीप्रदर्शन
पाडेगाव हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव असल्याने येथून होणारा शुभारंभ लक्षवेधी ठरणार आहे. या कार्यक्रमास महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पार्टी फलटण तालुका व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फलटण तालुक्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

