
‘शकुनी मामा’च्या राजकारणाचा अस्त झाला असून फलटणचा विकास आता सुसाट होईल, असे प्रतिपादन मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. नगराध्यक्ष समशेरसिंहांनी ६ महिन्यांत शहर खड्डेमुक्त करण्याची ग्वाही दिली. वाचा प्रमुख नेत्यांची संपूर्ण भाषणे.
स्थैर्य, फलटण, दि. 26 डिसेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने मिळवलेला विजय हा केवळ सत्तांतर नसून ३० वर्षांच्या एकाधिकारशाहीचा अंत आहे. फलटणकरांनी ‘मास्टरमाईंड’ला आता पुण्यात धाडले असून, महाभारतातील शकुनी मामाप्रमाणेच येथील ‘शकुनी मामा’च्या राजकारणाचा अस्त झाला आहे, असा घणाघात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.
फलटण नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता आल्यानंतर आयोजित भव्य आभार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते दिलीपसिंह भोसले यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायकल पूर्ण झाली, आता ‘शकुनी मामा’चा अस्त : नामदार जयकुमार गोरे
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले,
“मी आज टमटममधून आलोय, कारण आता मोठ्या गाड्यांची गरज उरली नाही. बंगल्यावरचा ‘वॉचमन’ बदलला आहे. ३० वर्षे या फलटणमध्ये एक रामायण घडले. १४ वर्षांचा वनवास संपल्यावर युद्ध झाले आणि आता हे रामायण संपले आहे. महाभारतातील शकुनी मामा कधी यशस्वी झाला नाही, तसाच या कलियुगातील ‘शकुनी मामा’ देखील यशस्वी झाला नाही. ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीतून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती, त्याच निवडणुकीत हरून त्यांच्या राजकारणाचा अस्त झाला आहे. आता हे चक्र (सायकल) पूर्ण झाले आहे.”
कर्मचाऱ्यांना सज्जड दम
“काही शिक्षक आणि ग्रामसेवकांनी या निवडणुकीत पडद्याआडून राजकारण केले. मी शिक्षकांच्या बाजूने उभा राहणारा माणूस आहे, पण ज्यांनी शासकीय पगार घेऊन दुकानदाऱ्या चालवल्या आहेत, त्यांची गय केली जाणार नाही. अशा शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी द्या, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
२०० कोटींचा निधी देणार
“तुम्ही नगराध्यक्ष दिला, आता पंचायत समितीचा सभापती महायुतीचा द्या. तुमच्या वाट्याला ५० कोटींचा निधी असेल तर मी २०० कोटींचा निधी रस्ते विकासासाठी देईन. फलटणच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,” अशी ग्वाही गोरे यांनी दिली.
चापलूसांनी राजाला संपवले : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एका कथेच्या माध्यमातून विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले,
“एका राजाच्या दरबारात अनेक चापलूस होते. ते राजाला सांगायचे, ‘जनता तुमच्यावर खूप खुश आहे.’ राजा खुश होऊन त्यांना बक्षिसे द्यायचा. दिवाणजींनी चापलूसांना सांगितले की, तुम्ही राजाचे कान खुश केले, पण जनतेचे काय? तसेच फलटणमध्ये घडले. ४० चापलूसांनी नेत्याला घेरले होते आणि नेते महिन्यातून एकदा यायचे. चापलूसांनी राजाला खुश ठेवले आणि जनता कधी सोडून गेली हे राजाला कळलेच नाही.”
सहा महिन्यांचे चॅलेंज
“नगराध्यक्ष समशेरसिंहांनी सहा महिन्यांत शहर खड्डेमुक्त करण्याचे जे आश्वासन दिले आहे, ते ऐकून मलाही धक्का बसला. पण आता शब्द गेला आहे, तर तो पूर्ण करण्यासाठी मी, जयकुमार भाऊ आणि मुख्यमंत्री सर्व ताकद पणाला लावू. फलटणकरांनी मास्टरमाईंडला पुण्यात पाठवले आहे, आता शहराचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी आमची आहे,” असे त्यांनी सांगितले.
सहा महिन्यांत फलटण खड्डेमुक्त करणार : नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर
नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या पहिल्याच भाषणात विकासाचा रोडमॅप मांडला.
“फलटण हे माझे घर आहे आणि घराची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. विरोधकांनी ३० वर्षांत फलटणला केवळ उत्पन्नाचे साधन आणि दुकान समजले. ओपन स्पेस गिळंकृत केल्या, सातबारांमध्ये फेरफार केले. पण आता हे चालणार नाही. मी फलटणकरांना शब्द देतो की, येत्या सहा महिन्यांत फलटण शहरातील एकही रस्ता खड्डेमय राहणार नाही. शहरात ११ वर्षांपूर्वी बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाण्याचा थेंब नाही, तिथे कबुतरे आणि वटवाघुळे सापडत आहेत. ही पापं त्यांची आहेत. आम्ही येत्या दोन-तीन महिन्यांत या टाक्यांतून पाणीपुरवठा सुरू करू. भिकारी आणि जनावरांसाठीच्या ‘खावटी’ची तरतूदही ज्यांनी खाल्ली, त्यांना जनता माफ करणार नाही. आता प्रत्येक नगरसेवक हा त्या त्या वॉर्डचा सेवक म्हणून काम करेल.”
बारामतीसारखा विकास करून दाखवू : आमदार सचिन पाटील
आमदार सचिन पाटील यांनी विजयाबद्दल जनतेचे आभार मानले.
“विरोधकांकडे सांगण्यासारखे काही नव्हते, म्हणून त्यांनी केवळ द्वेषाचे राजकारण केले. पण जनतेने विकासाला कौल दिला आहे. रस्ते, पाणी आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर आमचा भर असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आपण फलटणला निधीचा महापूर आणू. फलटणला आता बारामतीसारखे विकसित शहर बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. आता विधानसभेपाठोपाठ नगरपालिका जिंकली, पुढचे लक्ष्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हेच आहे.”
माझ्या मनावरच्या जखमा भरून काढा : सौ. जिजामाला नाईक निंबाळकर
जिजामाला नाईक निंबाळकर यांनी अतिशय भावुक होत महिलांना साद घातली.
“निवडणुकीच्या काळात माझ्या पतीवर (रणजितसिंह) जे खालच्या पातळीचे आणि घाणेरडे आरोप झाले, ते ऐकून माझ्या आणि माझ्या मुलीच्या डोळ्यांत पाणी आले. विनयभंगासारखे खोटे आरोप लावताना त्यांना लाज वाटली नाही. आज आपण जिंकलो असलो तरी, एक पत्नी म्हणून माझ्या मनावरच्या त्या जखमा अजून भरलेल्या नाहीत. जर तुम्हाला त्या जखमा भरून काढायच्या असतील, तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांना पूर्णपणे हद्दपार करा. तेव्हाच माझा विजय पूर्ण होईल.”
सांस्कृतिक भवन आणि फिल्टरेशन प्लँटला प्राधान्य : माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले
सभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ नेते दिलीपसिंह भोसले यांनी शहराच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला.
“गेली ३० वर्षे फलटणचे सांस्कृतिक भवन बंद आहे, त्यामुळे शहराचा सांस्कृतिक दर्जा घसरला आहे. रणजितदादांनी नवीन सांस्कृतिक भवन मंजूर केले असून, ते लवकरच उभे राहील. शहरासाठी बांधलेले रेस्टहाऊस निरुपयोगी ठरले आहे, पण बंद पडलेला फिल्टरेशन प्लँट सुरू करणे हे आमचे पहिले काम असेल. ८७ साली आम्ही हायकोर्टात लढून जे शिक्षण मंडळ ताब्यात घेतले होते, ते विरोधकांनी बंद पाडले. ते पुन्हा सुरू करून गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे.”
या सभेला नागरिकांची अलोट गर्दी लोटली होती. विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

