
फलटण नगरपरिषदेत ३५ वर्षांची सत्तांतर घडवल्यानंतर आज सायंकाळी विजय सभा. मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर काय बोलणार? याकडे तालुक्याचे लक्ष.
स्थैर्य, फलटण, दि. २५ डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीने ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर आज शहरात भव्य विजय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. फलटण येथील गजानन चौक येथे सायंकाळी ६ वाजता ही सभा होणार असून, या सभेत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची तोफ धडाडणार आहे. ३५ वर्षांची सत्ता उलथवून लावल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच जाहीर सभेत नेते काय भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
विजयाचे गणित आणि सत्तांतर
नुकत्याच लागलेल्या निकालात फलटणकरांनी परिवर्तनाला कौल दिला आहे. एकूण २७ जागांपैकी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीने १८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर विरोधी गटाला (राजे गट प्रणित शिवसेना, काँग्रेस व कृष्णा भीमा विकास आघाडी) केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे, नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी बाजी मारली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ३५ वर्षांची राजे गटाची सत्ता संपुष्टात आली असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
रणजितसिंहांच्या भाषणाकडे लक्ष
या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार मानले जाणारे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या सभेत फलटणच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत दिलेली आश्वासने आणि भविष्यातील विकासाची दिशा यावर ते काय भाष्य करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
समस्यांचा डोंगर आणि नूतन पदाधिकारी
सत्ता मिळवणे हा पहिला टप्पा होता, मात्र आता शहराचा कारभार हाकणे हे नूतन पदाधिकाऱ्यांसमोरचे खरे आव्हान आहे. फलटण शहरात सध्या रस्ते, पाणी, स्वच्छता आणि वाहतूक कोंडी अशा समस्यांचा डोंगर उभा आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे १८ नगरसेवक या समस्यांवर कसा मार्ग काढणार? विकासाचा आराखडा कसा असेल? याबाबत आजच्या सभेत काही घोषणा होण्याची शक्यता आहे.
