
“फलटण तालुका ३०-३५ वर्षे पारतंत्र्यात होता, आता खरे स्वातंत्र्य मिळाले. २५ वर्षे मंत्री असूनही एक ‘डीपी’ देऊ शकले नाहीत,” जयकुमार गोरेंचा विरोधकांवर घणाघात. तरडगाव गटासाठी स्वतंत्र पॅकेजची घोषणा आणि रणजितसिंहांना ‘मंत्री’पदाचे अधिकार! वाचा पाडेगाव येथील प्रचार शुभारंभाचा सविस्तर वृत्तांत…
स्थैर्य, फलटण, दि. २३ जानेवारी : “फलटण तालुका हा गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून स्वातंत्र्यात नसून ‘पारतंत्र्यात’ होता. सन २०२५ मध्ये फलटण तालुक्याला खऱ्या अर्थाने ‘स्वातंत्र्य’ मिळालेले आहे. यापूर्वी सर्वसामान्य जनतेला कोणतेही काम करायचे झाल्यास ‘वाड्यावर’ जाऊन मुजरा करून काम करावे लागत होते. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. पाटणवरून कुणीही आले, काहीही बोलले तरी काळजी करू नका. डीपी डीसी (DPDC) मधून एक रुपया आला नाही तरी चालेल, त्यापेक्षा १० पट जास्त निधी मी ग्रामविकास विभागातून देईन,” अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी दिली.
पाडेगाव (ता. फलटण) येथे आयोजित भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महायुती) च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
“एक ‘डीपी’ देऊ न शकणारे कसला विकास करणार?”
विरोधकांवर, विशेषतः राजे गटावर सडकून टीका करताना ना. जयकुमार गोरे यांनी तरडगाव गटाचा धागा पकडला. ते म्हणाले, “फलटण तालुक्यामध्ये सलग २५ वर्षे मंत्रीपद व पालकमंत्रीपद असून सुद्धा तरडगाव जिल्हा परिषद गटामधील शिंदे माळ येथील एक साधे ‘डीपी’ (विद्युत रोहित्र) ते देऊ शकले नाहीत, तर त्यांनी नेमका कसला विकास केला? असा माझा त्यांना सवाल आहे. ज्यांनी या गटाचे सलग दोन पंचवार्षिक प्रतिनिधित्व केले आणि १५ वर्षे आमदार राहिले, त्यांना जर त्यांच्या गावचा विकास करता येत नसेल, तर त्यांनी केवळ विरोधकांना त्रास देण्यासाठीच सत्ता वापरली, हे सिद्ध होते.”
तरडगावसाठी ‘स्वतंत्र पॅकेज’ आणि कोरा चेक!
“तरडगाव जिल्हा परिषद गटाचा अनुशेष भरून काढण्यासाठी इथून महायुतीचे उमेदवार निवडून द्या. मी या गटासाठी ‘स्वतंत्र पॅकेज’ घोषित करेन,” असे आश्वासन गोरे यांनी दिले. तसेच, “ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील सांगतील तेवढा निधी मंजूर करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. मी ग्रामविकास मंत्री नसून खरे मंत्री रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच आहेत,” असे सांगत त्यांनी रणजितसिंहांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले.
ही निवडणूक ‘ग्रामविकास खात्याची’!
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ना. गोरे यांनी सांगितले की, “आताची निवडणूक ही खऱ्या अर्थाने ‘ग्रामविकास खात्याची’ निवडणूक आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या सर्व संस्था ग्रामविकास खात्याच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे जर तुम्हाला गावात विकास करायचा असेल, तर रणजितदादा आणि भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.”
रणजितसिंह नाईक निंबाळकर : “विरोधक आता संपणार”
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयकुमार गोरे खंबीरपणे पाठीशी आहेत. तालुक्यात आमदार सचिन पाटील यांनी प्रशासनाला थेट गावोगावी नेऊन लोकांचे प्रश्न सोडवले आहेत. या निवडणुकीत तरडगाव गटासह संपूर्ण तालुक्यातून विरोधक नक्कीच संपून जातील.”
आमदार सचिन पाटील : “सुपडा साफ होणार”
“तरडगाव जिल्हा परिषद गटासह फलटण तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्वच्या सर्व ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांमध्ये विरोधकांचा ‘सुपडा साफ’ होणार आहे,” असा विश्वास आमदार सचिन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
या मेळाव्याला पाडेगाव आणि परिसरातील नागरिक, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

