स्थैर्य, २९ : त्यांचा जन्म कारवार जिल्ह्यातील कानासगिरी येथे झाला त्यांनी १९५६ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी दिसतं तसं नसतं या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. झनक झनक पायल बाजे या व्ही .शांताराम यांच्या सिनेमामध्ये त्यांनी संध्या यांच्याबरोबर समूह नृत्यात काम केले.त्यांचे नृत्य कौशल्य पाहून त्यांना सांगत्ये ऐका या सिनेमामध्ये नायिकेची भूमिका मिळाली .तो सिनेमा प्रचंड यशस्वी ठरला आणि त्या नंतर त्यानी भूमिका केलेल्या सिनेमांची रांगच लागली
मराठी सिनेमामधील १९६० चे दशक तमाशाचे कथनकानी भरले होते आणि सिनेमा यशस्वी व्हायचा असेल तर त्यात जयश्री गडकर असल्या पाहिजेत अशी परिस्थिती निर्माण झाली होती . तमासगीर म्हणून काम केले असले तरी साधी माणसं या सिनेमामध्ये त्यांनी शंकर लोहाराची बायको पार्वती होऊन भाता हलवताना चित्रित झालेले , जगदीश खेबूडकरांचे “ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे ” हे अगदी सोज्वळ गाणे एकदम मस्त आहे.
जगदीश खेबूडकरांचा कार्यक्रम आम्ही केला होता. कार्यक्रमानंतर प्रेक्षक श्रोते एका वेगळ्याच धुंदीत घरी परत जाताना पहिले आहे. या कार्यक्रमात त्यांनी साधी माणसं चित्रपटासाठी लिहिलेल्या गाण्यांपैकी ऐरणीच्या देवा तुला या गाण्याचे मूळ शब्द ऐरणीच्या देवा तुला आगीनंफुलं वाहू दे असे होते. रेकॉर्डिंग करताना आगीनफूल शब्द मीटरमध्ये बसत नाही म्हणून रेकॉर्डिंग खोळंबले होते तेव्हा तिथे शांता शेळके आल्या होत्या , अडचण कळल्यावर त्यांनी लगेच आगीनंफुलं च्या ऐवजी ठिणगी ठिणगी लिहा असे सांगितले.आणि एक सुंदर गाणे “ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे रेकॉर्ड झाले.अशी आठवण सांगितली होती.
जयश्री गडकर या मराठी चित्रपट सृष्टीत ५० सोनेरी वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या एकमेव अभिनेत्री होत्या. त्यांना प्रेमाची मानवंदना देण्यासाठी जयश्री गडकर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या असामान्य कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी “जयश्री गडकर : नक्षत्रलेणं’ हा ग्रंथ नागपूर शहरात ८ मार्च २००९ ला प्रकाशित करण्यात आला. मराठीतील दिग्गज अशा १२१ मान्यवरांनी जयश्रीबाईंविषयी खास आठवणी या पुस्तकात लिहिल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील काही खास प्रसंगांची विपूल अशी रंगीत व कृष्णधवल छायाचित्रे यात समाविष्ट आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांच्या चित्रपटातील गाजलेली ५० गाणी, चित्रपटांचे कथानक, कलाकार, तंत्रज्ञांची सूची व शंभरहून अधिक हिंदी, गुजराती, पंजाबी इतर भाषांमधील चित्रपटांची माहिती या पुस्तकात आहे
जयश्री गडकर यांनी पती बाळ धुरी यांचे समवेत रामानंद सागर यांच्या प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या “रामायण “मालिकेमध्ये कौसल्या व दशरथाची भूमिका केली . जयश्री गडकर यांना मानिनी, वैंजयंता, सवाल माझा ऐका व साधी माणसं या चित्रपटांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.
जयश्री गडकर यांना विनम्र अभिवादन
त्यांच्यावर चित्रित होऊन गाजलेले गाणे ऐरणीच्या देवा तुला चित्रपट साधी माणस
प्रसाद जोग, सांगली. ९४२२०४११५०