दैनिक स्थैर्य | दि. ४ मे २०२३ | फलटण | भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली. त्यामध्ये कोळकी गावचे सुपुत्र व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणाऱ्या जयकुमार शिंदे यांची प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जयकुमार शिंदे हे कुशल संघटक असून त्यांना पक्षीय कार्याचा दीर्घकालीन अनुभव आहे. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रात पक्ष बळकट करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जयकुमार शिंदे यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, शहाजी पाटील, राम सातपुते, समाधान आवताडे, सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले.
भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष , ६ सरचिटणीस , १६ चिटणीस , ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, महाविजय अभियानाचे संयोजक आ. श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, अॅड. माधवी नाईक , संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ , प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश समन्वयक विश्वास पाठक आदी उपस्थित होते.
कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा ताई मुंडे, विजयाताई रहाटकर, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यमंत्री, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हिना गावित, राज्यातील सर्व खासदार, आमदार आदींचा समावेश आहे. याखेरीज २८८ विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक आणि ७०५ मंडलांचे प्रभारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.