जयकुमार गोरे कॅबिनेट मंत्री!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ डिसेंबर २०२४ | सातारा | माण – खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागली असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. ज्या जयकुमार गोरे यांना राजकारणातून संपवण्यासाठी अनेक दिग्गजांनी प्रयत्न केले होते; तेच जयकुमार गोरे आज कॅबिनेट मंत्री पदी शपथ घेणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. जयकुमार गोरे कॅबिनेट मंत्री झाल्याने काळ बदलला; हे आज सिद्ध झाले असल्याचे बोलले जात आहे.

जयकुमार गोरे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या राजकारणापासून केलेली होती. अपक्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी माण तालुक्यामध्ये राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष आमदार म्हणून ते पहिल्यांदा माण – खटाव विधानसभा मतदारसंघावर निवडून गेले होते. त्यानंतर काँग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर जयकुमार गोरे हे विधानसभेवर निवडून गेलेले होते. कुटुंबामध्ये कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणामध्ये उतरून माण – खटाव तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेले संपूर्ण जिल्ह्याने बघितले आहे.

जयकुमार गोरे यांचे राजकारण संपवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी अनेक प्रयत्न केले होते. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही; जयकुमार गोरे हे अनेक सभा, मुलाखतींमधून सांगत असतात. राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करणारे राजकारणात संपले; परंतु आपण जनतेची सेवा करीत आहोत.

जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू…

कॅबिनेट मंत्री होत असलेले जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मत हे स्वतः जयकुमार गोरे यांनी अनेकदा व्यक्त केले आहे. जयकुमार गोरे हे कॅबिनेट मंत्री होत असल्याने माजी खासदार रणजितसिंह हेच कॅबिनेट मंत्री झाले असल्याचे मत सुद्धा व्यक्त केले जात आहे.

श्रीमंत रामराजे गटासाठी मोठा धक्का…

विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कायमच जयकुमार गोरे यांच्या विरोधात भूमिका घेतलेली संपूर्ण सातारा जिल्ह्याने बघितलेली आहे. जयकुमार गोरे हे कॅबिनेट मंत्री होत असल्याने व फलटण मतदारसंघांमधून सुद्धा जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचाराचा आमदार निवडून गेल्याने आता येणाऱ्या काळामध्ये श्रीमंत रामराजे यांच्या गटाला मोठा धक्का लागला असल्याची चर्चा सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!