दैनिक स्थैर्य | दि. १८ जानेवारी २०२५ | फलटण | ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली असल्याने हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वच विकासकामे बुलेट ट्रेनच्या स्पीडने मार्गी लागतील; असा विश्वास असल्याचे मत माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर दैनिक “स्थैर्य”ला विशेष माहिती देताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.
नुकतीच नियुक्ती करण्यात आलेले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यांच्या मैत्रीने गेले काही वर्ष सातारा व सोलापूर जिल्हा गाजवला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते – पाटील गट व राजे गट यांना सज्जड इशारा मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.