स्थैर्य, सातारा, दि. 20 : त्यावेळी आमची कुलदीप पवार आणि चेतन दळवी अभिनित पती सगळे उचापती आणि संतोष पवारांचे जाणून बुजून ही नाटक सुरू होती. मी नुकताच कुर्ल्याहून ठाण्याला शिफ्ट झालो होतो. प्रत्येकी शनिवार रविवारी प्रयोग नाहीतर दौरे यामुळे घरी टीव्ही घ्यायचा राहिला होता.
पण एका रविवारी ही संधी चालून आली. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मॉल नव्हते. ठरलेली टीव्हीची दुकान दुपारी टीव्हीच्या दुकानात गर्दी कमी असते म्हणून दुपारी दुकानात पोहोचलो. टीव्ही पसंद करीत असताना माझा मोबाईल वाजला. पलीकडे आमचे एक नाटय वितरक होते. बोला मी म्हणालो…संदीप पुण्याहून मुंबईला येताना “यदा कदाचित” या नाटकाच्या बसचा पुण्याजवळ अपघात झालाय. काही कलाकार जखमी झाले आहेत त्यांना पुण्यात ऍडमिट केलंय. बापरे… मी म्हणालो…पलीकडून ते म्हणाले मला तुझी मदत हवी आहे. बोला ना काय करायचे आहे. मी…ते म्हणाले अरे यदाकदाचित नाटकाचा आज भाईंदर मध्ये प्रयोग होता. मीच दिला होता म्हणून ते निघाले होते पुण्याहून प्रयोगाला… त्या ठिकाणी तुमचा जाणून बुजून या नाटकाचा प्रयोग होईल का…मी म्हणालो मला एक तास द्या मी कळवतो तुम्हाला. प्रयोग कितीचा आहे…नऊला सुरू करायचा आहे. ते ओके मी म्हणालो आत्ता दुपारचा एक वाजला आहे प्रयोगाच्या ठिकाणी सात पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. म्हणजे पाच सहा तास आहेत. जाणून बुजून हे नाटक म्हणजे सर्कस होती. तीस पस्तीस कलाकार आणि बारा तेरा रंगमंच कामगार म्हणजे अंदाजे पन्नासच्या आसपास माणस उपलब्ध आहेत का ते एका तासात बघायचे होते. त्यावेळी मोबाईल हा प्रकार नुकताच सुरू झाला होता. त्यामुळे प्रत्येक कलाकाराकडे मोबाईल नव्हते. मी घाई घाईत एक टीव्ही पसंद केला. बायकोला सांगितले तू टीव्हीची डिलिव्हरी घेऊन घरी जा. आत्ता मला वेध लागले होते प्रयोगाचे. खरतर काँट्रॅक्ट शो म्हणजे निर्मात्याला फायदा आणि आनंद असतो. पण इथं चित्र वेगळं होत. आपल्या सहकार्यांना झालेल्या अपघाताचे दुःख मनात साठवत जबाबरीने प्रयोग सादर करायचा होता. मी माझा सहकारी दुर्गेशला फोन केला. तो सुदैवाने घरीच होता. त्याला गडकरीला बोलावले…त्याच्या मदतीने आम्ही भराभर फोन केले. सुदैवाने तीन चार जण सोडता सगळे सापडले. जे सापडले नाहीत त्यांना निरोप ठेवले. आमच्या नाटय वितरक ज्यांनी मला फोन केला होता त्यांना प्रयोग होईल म्हणून सांगितले आणि आम्ही भाईंदरला निघालो. सेटचा टेम्पो पण पोहोचला होता. साडेसात पर्यत कलाकार आणि रंगमंच कामगार यांचा कोरम पूर्ण झाला. आत्ता धास्ती आणी जबाबदारी होती प्रयोगाची. कारण जिथे प्रयोग होता तो एक नाटय महोत्सव होता. आमची आधी दोन नावाजलेली नाटक झाली होती. आयोजक ही धास्तावलेले होते. प्रयोग सुरू झाला…जाणून बुजून या नाटकाची खासियत अशी होती की आमचे कलाकार नवखे होते पण ते उत्तम प्रयोग सादर करीत. आशिष पवार, भूषण कडू, विनय नलवडे, निरंजन देशपांडे, धनश्री करमरकर, दुर्गेश आकेरकेर, भीमराव मुढे आणि इतर आज नावाजलेले कलाकार आहेत. प्रयोग संपला…आयोजक आणि प्रेक्षक बेहद्द खुश झाले…आम्ही उत्कृष्ट सादरीकरण करून आमच्या जबाबदारीतून मुक्त झालो.
असाच दुसरा प्रसंग… मुरबाड येथे मा प्रमोद हिंदुराव साहेब यांनी एका महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यांना मी सागर कारंडे, भारत गणेशपूरे, अनिता दात्ये यांचे हलकं फुलक हे नाटक दिले होत. सेलिब्रिटी असल्यामुळे नाटकाला तुफान गर्दी झाली. नाटक उत्तम रंगल…
मध्यन्तरात हिंदुराव साहेब मला म्हणाले…उद्या पण एक नाटक ठेवू…कुठलं जमतंय ते सांगा…म्हणजे हे नाटक संपलं की मी उद्याच्या नाटकाची अनोन्समेंट करीन. मा.हिंदुराव साहेब राजकारणी असूनही एक सहृदयी दिलदार रसिक व्यक्तिमत्व त्यामुळे माझी जबाबदारी वाढली. मी घड्याळात बघितले…साडे अकरा वाजले होते…एक दोन लोकांना फोन केले नकार आला…आत्ता मुंबईत कोण जाग असणार आणि मला प्रयोगाची खात्री कोण देणार…त्यासाठी सकाळचीच वाट पहावी लागणार…अरे देवा…आणि नाटक म्हटल की सेलिब्रिटी हवेत…त्यावेळी आम्ही पाऊले चालती पंढरीची वाट हे नाटक करीत होतो…पण त्यात प्रत्यक्ष पांडुरंग सोडला तर कोणीच सेलिब्रिटी नव्हते…पण प्रयोग उत्तम व्हायचा. मी मुंबईला सचिन गजमलला फोन केला तो पाऊले नाटकाचा सर्वे सर्व्हा सचिन तसा एक उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक आणि माझा जवळचा मित्र सुद्धा तो म्हणाला बरेच दिवस प्रयोग झाला नाही. तालीम करावी लागेल…कारण या नाटकात वारी नृत्य होती…ते तु माझ्या वर सोड…आणि सगळी टीम आहे का बघ…आणि सगळ्यांना उद्या बारा वाजता मुरबाडला प्रयोगाला जाण्यासाठी यशवंत माटुंग्याला बोलावं…ही टीम पण पन्नास जणांची होती…सचिन आणि राजा मुंबईत कलाकार जमण्याच्या कामाला लागले…हलकं फुलक नाटक संपलं…इकडे मी हिंदुराव साहेबांना उद्याच्या नाटकाचे नावं सांगितले… पाऊले चालती पंढरीची वाट… त्यांनी यात कोण आहे नाटक कसे आहे हे काही विचारले नाही. माझ्या वर विश्वास ठेवून त्यांनी अनौन्समेन्ट केली. उद्या या ठिकाणी पाऊले चालती पंढरीची वाट हे नाटक होणार आहे…तरी आजच्या प्रमाणे उद्या ही नाटकाचा आनंद घ्यायला नक्की या…आत्ता माझी जबाबदारी वाढली…मुरबाड हुन रात्री घरी यायला पहाट झाली…सकाळी यशवंतला पोहोचलो…बस सेटिंगचे समान घेऊन आली होती….सचिन आणि राजानी त्यांचे काम चोख केले होते… रातोरात त्यांनी पुर्ण टीम जमा केली होती. आम्ही मुंबईतून लवकर निघाल्यामुळे चारलाच मुरबाड ला पोहोचलो. ज्या ठिकाणी हा महोत्सव होता ती जागा मार्केट यार्ड मध्ये होती…मोठी मोठी शेड्स होती. रात्रीच त्यातली एक शेड मी हेरून ठेवली होती ती साफ करून घेतली. मुलांना चहा नाश्ता दिला आणि तालीम ज्याला आम्ही रनथ्रू म्हणतो सुरू केली. साहेबांचे हर्णे आणि इतर कार्यकर्ते मदतीला होतेच. रात्र झाली…प्रयोगाची वेळ जवळ आली…कालच्या सारखच मैदान प्रेक्षकांनी भरून गेलं होतं. पखवाज आणि पांडुरंगाच्या जयघोषाने नाटक सुरू झाले. उत्तरोत्तर रंगत गेले…पांडुरंगाच्या भक्तिरसात प्रेक्षक न्हाउन निघाले…शेवटच्या पालखी सोहळ्यात काही प्रेक्षक पण सहभागी झाले…सगळीकडे विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठल…पांडुरंग झालेल्या सचिन ने मला मिठी मारली…संताना पांडुरंग उराउरी भेटत असे अस म्हणतात पण कलियुगात पाऊलेच्या प्रत्येक प्रयोगा नंतर मला पांडुरंग असा भेटत असे…हिंदुराव साहेब खुश झाले आणि मी एका जबदारीतून मुक्त झालो…काही दिवसांपूर्वी मुक्ताईची पुण्यतिथी होती…मुक्ताई कृपेने मी आर्थिक दृष्ट्या नसेन पण लौकिक दृष्ट्या समाधानी आहे…मुक्ताई म्हणते…अखंड जयाला देवाचा शेजार…कारे अहंकार नाही गेला…मान अपमान वाढविसी हेवा…दिवस असता दिवा हाती घेसी…
संदीप शशिकांत विचारे