दैनिक स्थैर्य । दि.१२ मे २०२२ । सातारा । सैनिकी परंपरा असलेल्या अपशिंगे (मि.) ता.सातारा येथील जवान सुधीर सूर्यकांत निकम यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणातव शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
जामनगर (गुजरात) येथे कर्तव्य बजावत असताना जवान सुधीर निकमहे आजारी पडले होते. त्यांना मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे निधन झाले. हे वृत्त अपशिंगे (मि.) येथे कळताच गावावर शोककळा पसरली.
बुधवारी सकाळी जवान सुधीर निकम यांचे पार्थिव अपशिंगे (मि.) येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली. तद्नंतर सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली मधून त्यांच्या अंत्ययात्रेस सुरवात झाली. येथील विजयस्तंभाजवळ अंत्ययात्रा आल्यावर गावाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खा.उदयनराजे भोसले, युवा नेते सागर पाटील,तहसीलदार आशा होळकर, गट विकास अधिकारी सुवर्णा चव्हाण,बोरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, माजी पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे, सरपंच सारिका गायकवाड, उपसरपंच राजश्री करांडे, बी. आर. ओ. कोल्हापूर, एन.सी.सी बटालियन कराड यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. शेवटी शोकाकुल वातावरणात बंधू सागर निकम व मुलगा श्रवण निकम यांनी त्यांच्या चितेला भडाग्नी दिली. यावेळी उपस्थित जनसमुदायाने “भारत माता की जय” “वीर जवान सुधीर निकम अमर रहे” च्या घोषणा दिल्या.