दैनिक स्थैर्य | दि. २९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
सातार्यातील सर्व ब्राह्मण संघटनांचे प्रातिनिधिक स्वरूप असलेल्या परशुराम सेवा संघाच्या बैठकीत ब्राह्मणविरोधी आणि जातीयवादी वक्तव्ये करणारे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तसेच ब्राह्मण समाजाला तीन मिनिटांमध्ये संपवण्याची प्रक्षोभक भाषा करणार्या मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर त्वरित आणि कडक कारवाई करण्याची मागणीही या बैठकीत करण्यात आली.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात मनोज जरांगे यांनी ‘बामणी कावा’ असा उल्लेख केला होता. हा ब्राह्मण समाजाचा अपमान असून जरांगे यांच्या या जातीयवादी विधानाबद्दल त्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवण्याची भाषा करणार्या जरांगे यांच्या समर्थकांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी, अन्यथा ब्राह्मण समाजाच्या संरक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली.
ब्राह्मण समाज कोणत्याही गोष्टीला प्रतिक्रिया देत नाही आणि शांत बसतो, पण कोणी काहीही बोललेले यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला. कायदेशीर तज्ज्ञांची मदत घेऊन आगामी कालावधीमध्ये ब्राह्मण समाजाची बदनामी करणार्यांना कायदेशीर पातळीवरच उत्तर देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकासामध्ये ब्राह्मण समाजाचे मोठे योगदान आहे. ब्राह्मण समाजाचे मराठा आणि इतर सर्वच जातींमध्ये मैत्रीसंबंध आहेत. आजपर्यंत सर्वजण गुण्या-गोविंदाने राहत आहेत. ब्राह्मण समाजाच्या मनात कोणत्याच जाती धर्माबाबत आकस किंवा द्वेष नाही. असे असताना केवळ ब्राह्मण समाजाच्या द्वेषातून काही दिवस या समाजावर खालच्या पातळीवर टीका करण्याची चढाओढ लागली आहे, पण अशी मानहानी यापुढे ब्राह्मण समाज अजिबात खपवून घेणार नाही आणि सर्व स्तरावर सर्वप्रकारे अशा घडामोडींचा मुकाबला केला जाईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.
येत्या काही दिवसांमध्ये आगामी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असून संपूर्ण पक्षनिरपेक्ष पद्धतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ भाजपच नाही तर इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी सांगणार्या ब्राह्मण समाजातील व्यक्तींनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
कोटेश्वर कॉलनी येथे संकेत पुराणिक यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत प्रथम मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रज यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
बैठकीला संकेत पुराणिक, प्रशांत जोशी, रवींद्र आपटे, मुकुंद फडके, गोविंद फडके, हेमंत कापरे, प्रकाश कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, राजेंद्र अनगळ, श्रीनिवास वाठारे, मिलिंद कुलकर्णी, अमित काळे, सुयोग इनामदार, समीर पंडितराव, अरुण कुलकर्णी, मंदार सुदामे, धनंजय विश्वास कुलकर्णी, अमृता गोखले, आदित्य गोखले, महेश हवेले, राजेंद्र देशपांडे, नंदकुमार वाकडे, गिरीश जोगळेकर, रघुनंदन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.