आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपले शरीर आणि मन याचा समन्वय असेल तर आपला दिवस उत्साही आणि सत्कारणी लागत असतो. आज – काल हे समन्वय बिघडून गेलेले आहे.
माणसाचे शरीर, काम करत असते आणि मन नको त्या गोष्टीची चिंता करत असते. शरीर कष्टाने थकते आणि मन विचार करून थकते. आपण दिवसभरामध्ये डोक्यावर किंवा शरीरावर कामाचा जेवढा भार वहात असतो. त्याच्यापेक्षा जास्त आपल्या डोक्यात भार वहात असतो. डोक्यावरच्या भारापेक्षा डोक्यातील भार माणसाला जास्त दमवतो. कारण तो जास्त त्रासदायक असतो.
आपल्या अगोदरची पिढी शरीराने खूप कष्ट करत होती आणि मनाने खूप मोकळी होती. त्यामुळे आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानासुद्धा ती आनंदात राहत होती. आज आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे, पण मन मात्र नको ते ओझे घेऊन फिरत आहे. आपण कितीही आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, तरी त्यात यश येत नाही कारण आपली दिशा चुकत आहे.
कोणत्याही कार्याचे कर्तेपण स्वतःच्या डोक्यात असेल. तर त्याची जबाबदारी त्याच्या डोक्यात घुसल्या शिवाय राहत नाही. एकदा डोक्यात हे ओझे घुसले की आनंदाची आपली गाठ भेट होत नाही. आजकाल शारीरिक आजारापेक्षा मानसिक व्याधीची माणसं भरपूर आढळतात. यावर सोपा उपाय म्हणजे चिंतन, मनन, वाचन, लेखन, बोलणे यावर भर दिला पाहिजे.
शारीरिक व्याधी दिसून येतात. पण मानसिक व्याधी हिरव्यागार झाडावानी दिसते. पण आतून वाळवीने पोखरलेले आहे. कुणाजवळ तरी मन मोकळे बोलणे हवे. यासाठी जीवाभावाची चार माणसं जोडा. पद, पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान, मीपणा यातून बाहेर आल्यास मन धावणार नाही व थकणार नाही.