जनतेच्या समस्यांचा जागेवर निपटारा; रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांचा “जनता दरबार” विविध प्रश्नांनी गाजला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० जानेवारी २०२५ | फलटण | फलटण तालुक्यात आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला. या आयोजनात फलटण तालुक्यातील नागरिकांच्या अनेक प्रलंबित समस्यांचा जागेवर निपटारा करण्यात आला.

फलटण शहरातील महाराजा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या जनता दरबारात, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी व अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, महानंदाचे माजी उपाध्यक्ष डी. के. पवार, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी क्रीडा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कृषी विभाग, नीरा उजवा कालवा विभाग, सहाय्यक निबंधक कार्यालय, वन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, धोम – बलकवडी पाटबंधारे विभाग, फलटण शहर पोलीस स्टेशन, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, भूमी अभिलेख विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण), फलटण नगरपरिषद, महसूल विभाग अर्थात तहसीलदार कार्यालय व प्रांताधिकारी कार्यालय या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

युवा नेते सचिन सस्ते यांनी माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांनी सुरू केलेली गिरवी ते मुंबई एसटी सेवा कोरोना कालावधीपासून बंद असल्याचे नमूद करून त्याचे तातडीने सुरु करण्याची मागणी केली. या एसटी सेवेमुळे गिरवी पंचायत समिती गणामधील नागरिकांची समस्या तातडीने सुटेल, असे त्यांनी व्यक्त केले.

आमदार सचिन पाटील यांनीही नागरिकांना आवश्यक कागदपत्रांच्या नुसार अर्ज करण्याचे आवाहन केले व प्रलंबित अर्जांवर पुढील महिन्याच्या आढावा बैठकीच्या पूर्वी सर्व विषय मार्गी लागणार असल्याचे आश्वासन दिले. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अनुप शहा यांनी या जनता दरबाराचा उपक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

फलटण तालुक्यातील नागरिकांच्या अनेक प्रलंबित समस्यांवर या जनता दरबारातून तातडीने कार्यवाही करण्यात आली, ज्यामुळे नागरिकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. या आयोजनामुळे नागरिक व शासकीय अधिकाऱ्यांमधील संवाद सुधारण्यात मदत झाली आणि नागरिकांच्या समस्या जागेवरच निपटून काढण्याचा एक चांगला मार्ग मिळाला.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

Back to top button
Don`t copy text!