
स्थैर्य, नागपूर, दि.१९: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान नागपुरातही कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार येथे जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. दरम्यान नुकतीच नागपूर पालिका आयुक्तपदावरुन बदली झालेल्या तुकाराम मुंढेंना पुन्हा एकदा नागपुरात आणण्याची मागणी केली आहेत.
आयएएस तुकाराम मुंढे म्हटलं की, एक कर्तव्यदक्ष आणि कडक शिस्तीचा अधिकारी अशी प्रतिमा आपल्या समोर येते. तुकाराम मुंढे हे गेल्या काही महिन्यांपासून नागपूर पालिका आयुक्तपदी होते. नुकतीच त्यांची बदली झाली. मात्र नागपुरातील कोरोनाची स्थिती पाहता, त्यांची बदली रद्द करुन, पुन्हा नागपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्त करा, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. शिवसेनेचे नागपूर उपजिल्हाप्रमुख आणि नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी याबाबतचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
पत्रात काय म्हटलंय?
तुकाराम मुंढे यांना नागपुरात पुन्हा आणावे यासाठी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. अनेक प्रयत्न करुनही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाही. आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे. तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त असताना नागपुरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यामुळे त्यांची पुन्हा नागपुरात आयुक्त म्हणून बदली कराट, असं किशोर कुमेरिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
नागपुरात दोन दिवस जनता कर्फ्यू
राज्यात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. सुरुवातीच्या काळात रुग्ण वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन पाळण्यात आलं. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून सर्व अनलॉक आहे. नागरिक आपापल्या कामावर जात आहे. मात्र कोरोना रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत आहे. दरम्यान नागपूर हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला आहे. त्यामुळे आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी नागपुरात जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. त्यामुळे आपल्या जीवाची आणि आरोग्याची काळजी घेत नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे