दैनिक स्थैर्य | दि. ९ जून २०२३ | फलटण |
अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या सर्वसामान्य गरजा आहेत. अगदी तशीच किंबहुना त्या तीन गरजांची पूर्तता करणारी जननी अशी महत्वाची गरज म्हणजे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन असल्याचे स्पष्ट प्रतिपादन वृक्षारोपण चळवळीत अग्रभागी राहून स्वतः काम करणारे डॉ. महेश बर्वे यांनी केले आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनविभागाच्या वतीने येथील नवलबाई मंगल कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्तम काम करणार्या व्यक्ती, संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये यांना ‘वनमित्र पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण समतोल या विषयावर प्रबोधन करण्यात आले.
हल्लीच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा या मुख्य गरजा सोडून बाकी खूप सार्या गरजा निर्माण झाल्या आहेत आणि त्या सगळ्या गरजांचे परिणाम आपण भोगत आहोत, असे सांगत आज सामाजिक वनीकरण आणि आपला वनविभाग जे झटून काम करीत आहे, त्याचा उदो उदो करण्याची, जनजागृती करण्याची गरज आहे. अशी जनजागृती घडली आणि घरोघरी वसुंधरा रक्षक नांदू लागले तर आजच्या सारखे हे पुरस्कार अगदी सर्वसामान्य होऊन जातील. त्यादृष्टीने पाऊल टाकायचा एक प्रयत्न करणार असल्याचे डॉ. महेश बर्वे यांनी सांगितले.
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत सक्रिय होत असलेल्या फलटणचे नाव या क्षेत्रात अग्रेसर राहील यासाठी साथ करण्याचे आवाहन करताना दि. ११ जुलै हा ‘जागतिक लोकसंख्या दिन’ यापुढे ‘फलटण निसर्गोत्सव’ म्हणून कॅलेंडरवर नोंदला गेला पाहिजे. या दिवशी फलटण परिसरातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घर, प्रत्येक पेठ, प्रत्येक रस्ता, प्रत्येक वाड्या, प्रत्येक वस्त्या सकाळी हातात झाड घेऊन ते झाड लावतानाचे मनोहरी चित्र पाहायला मिळावे, अशी अपेक्षा यावेळी डॉ. महेश बर्वे यांनी व्यक्त केली.
प्रारंभी वनक्षेत्रपाल फलटण एस. एस. रघतवान यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात जागतिक पर्यावरण दिन, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याविषयी मार्गदर्शन केले. पर्यावरणाची हानी व त्यामुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम याविषयी तसेच त्यातून उद्भवणारे संभाव्य धोके याविषयी विवेचन केले. फलटण विभागातील वनविभागाच्या कार्याचा आढावा घेतला. पर्यावरणपूरक आणि त्यासाठी आवश्यक प्रबोधन यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण समतोल याविषयी जागृती केलेल्या कार्याचा विचार करुन तालुक्यातील शाळा, महाविद्यालये यांना ‘वनमित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे वनक्षेत्रपाल एस. एस. रघतवान यांनी निदर्शनास आणून दिले.
या समारंभात फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण, मुधोजी महाविद्यालय फलटण, कृषी महाविद्यालय फलटण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण तसेच रयत शिक्षण संस्था संचलित विधी महाविद्यालय फलटण यांना ‘वनमित्र पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
तालुक्याच्या ग्रामीण भागातील पोलीस पाटील यांनी आपल्या भागातील पर्यावरणपूरक उपक्रमांना सक्रिय साथ केली. वृक्षसंवर्धन कामी वनविभागाला सहकार्य केल्याबद्दल तालुक्यातील मिरगाव, खडकी, दालवडी, मांडवखडक, उपळवे, वेळोशी, ताथवडा, गिरवी, बोडकेवाडी, धुमाळवाडी, भांडळी, दुधेबावी, आंद्रुड, जावली, वडले, सरडे, खटकेवस्ती, काशीदवाडी, गुणवरे, जिंती, ठाकूरकी, तावडी, निंभोरे, मिरढे, वडजल, भिलकटी, विंचुर्णी, सस्तेवाडी, साखरवाडी, सुरवडी, नांदल, आरडगाव, काळज, सालपे, हिंगणगाव, वाघोशी, मलवडी, बिबी, पिराचीवाडी, ढवळ येथील पोलिस पाटील यांना ‘वनमित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलिस पाटील संघटनेचे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर पाटील आणि तालुका संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय सरक पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती रेश्मा व्होरकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सचिन रघतवान यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, मुधोजी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि विधी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, वसुंधरा ग्रुपचे सर्व सदस्य, वसुंधरा रक्षक ग्रुपचे सर्व सदस्य, फलटण तालुक्यातील निसर्ग मित्र, सर्व सर्पमित्र, वन्यप्राणी रेस्क्यू टीमचे सदस्य, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष, सरपंच, सर्व वनसेवक या कार्यक्रमास उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून गावागावात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन चळवळ पोहोचविलेले मुधोजी महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. सुधीर इंगळे यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी सूत्रसंचालन, समारोप व आभार प्रदर्शन केले.