सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा


दैनिक स्थैर्य । 4 जुलै 2025 । सातारा। सांगली येथीलगर्भवती भगिनीच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी, तसेच सक्त धर्मांतर बंदी कायदा करावा, या मागणीसाठी शहरात सकल हिंदू समाज यांच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.या वेळी मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी नागेश गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृत प्रार्थनास्थळे आहेत. त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, धर्मांतरण करणार्‍यांवर कारवाईकरावी, अशी मागणी करण्यात आली.

सांगली येथील एका हिंदू विवाहितेने ख्रिश्चन धर्मांतरासाठी होणार्‍या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाचा कसून तपास व्हावा, तसेच तिच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. याबरोबरच सक्त धर्मांतर बंदी कायदा करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली.

या वेळी वर्षा डहाळे, धर्म जागरण जिल्हा संयोजक सचिन वाळवेकर, सातारा जिल्हा कार्यवाहक महेश शिवदे, मुकुंदराव आफळे, विश्व हिंदू परिषद अध्यक्ष विजयराव गाढवे, अतुल शालगर तसेच विविधसंघटना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, इस्कॉन आर्ट ऑफ लिव्हिंग, हिंदू जागरण समिती, हिंदू एकता, धनगर समाज, मातंग समाज, वडार समाज, मराठा समाज, नाभिक समाज व इतर समाजाचे प्रतिनिधींसह पालिकेचे माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यापूर्वी सकल हिंदू समाज यांच्या वतीने पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यावेळी विविध वक्त्यांनी मनोगत व्यक्त करून सक्त धर्मांतर बंदी कायदा करावा, अशी मागणी केली. त्यानंतर मोर्चास प्रारंभ झाला.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, श्रीराम असा जयघोष करत अग्रभागी हातात भगवे ध्वज घेऊन युवती चालत होत्या. त्यांच्या पाठोपाठ महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर बंदोबस्त ठेवला होता.


Back to top button
Don`t copy text!