
दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । फलटण । ‘‘प्रतिकूल बिकट राजकीय व सामाजिक परिस्थिती असूनसुद्धा बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 पासून मुंबईमधून पहिल्या ‘दर्पण’ या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून मराठी व इंग्रजी अशी संमिश्र पत्रकारिता सुरु केली. आज मराठी पत्रकारितेचा वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आदी माध्यमातून झालेल्या प्रचंड विस्ताराचा पाया ‘दर्पण’ हे वृत्तपत्र होते; हे आपणा सर्वांना अभिमानास्पद आहे. लोकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोचविणे, पाश्चिमात्य आधुनिक ज्ञान, माहिती जनतेपर्यंत जावी व त्यातून समाजाचे लोकशिक्षण व्हावे हा जांभेकरांचा प्रयत्न पत्रकारितेला आजही आदर्श असाच आहे’’, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे पुणे विभागीय उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांनी केले.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 210 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेच्या सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात डॉ.पाटोदकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रा.मिलींद जोशी होते. तर व्यासपीठावर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, मसाप पुणे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, दुबई येथील उद्योजक विनोद जाधव, सावा हेल्थकेअर लि; (पुणे) संचालक विशाल जाधव, मसाप पुणे कोषाध्यक्ष सौ.सुनिताराजे पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी या सर्वांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
‘‘बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य फक्त पत्रकारितेपुरतेच मर्यादित नव्हते तर तत्कालीन ग्रंथनिर्मिती, शिक्षण, सामाजिक सुधारणा, स्त्री शिक्षण, धार्मिक चिकित्सा, शिलालेख संशोधन अशा विविध क्षेत्रात त्यांचे अष्टपैलू कतृत्त्व होते. त्यांचे स्मरण आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे’’, असे स्पष्ट करुन आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यानंतरच्या दीर्घकाळात उपेक्षित राहिलेल्या बाळशास्त्रींचे कार्य पुन्हा समाजासमोर आणण्यासाठी त्यांच्या स्मरण कार्यात गेली 30 वर्षे सातत्याने कार्यरत असलेले महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ व त्यांचे सहकारी यांनी अभिनंदनीय कार्य केले आहे.’’
‘‘महाराष्ट्र शासनातर्फे मान्यवरांच्या अभिवादन यादीत गेल्या वर्षापासून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव समाविष्ट करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे शासनात प्रयत्न केले. त्याला गेल्या वर्षापासून यश आले. त्यामुळे आता दरवर्षी 20 फेब्रुवारी जांभेकरांची जयंती शासनाच्या राज्य व जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व कार्यालये, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये यातून संपन्न होत असल्यामुळे ‘दर्पण’ कारांच्या कार्याला नव्याने उजाळा मिळत आहे’’, असे रविंद्र बेडकिहाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले.
प्रास्ताविकात प्रकाश पायगुडे म्हणाले, ‘‘बाळशास्त्रींची बुद्धीमत्ता अफाट होती. त्यांना 14 भाषा अवगत होत्या. पत्रकार, साहित्यिक, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, इतिहास संशोधक अशा विविध भूमिकेतून त्यांनी महाराष्ट्रात सर्वात प्रथम समाजप्रबोधन केले.’’
कार्यक्रमास पूण्यभूषण फौंडेशनचे अध्यक्ष सतीश देसाई, मसाप पुणे कार्यवाह प्रमोद आडकर, वि.दा.पिंगळे, माधव राजगुरु, शिरीष चिटणीस, उद्धव कानडे, विभागीय माहिती सहाय्यक विलास कसबे, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ.म.शि.सगरे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्वस्त सौ.अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, निनाद पारखे, भारद्वाज बेडकिहाळ, सौ.वैशाली कुलकर्णी, सौ.विद्या पारखे, संदीप खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.