दैनिक स्थैर्य । दि.२० नोव्हेंबर २०२१ । सातारा । केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आज साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत साखर वाटून आपला आनंद साजरा केला. येथील सेव्हन स्टार चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार घोषणाबाजी केली .
याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले, केंद्र सरकारने जारी केलेले तीन कृषी कायदे काळे ठरले होते. या कायद्याच्या विरोधात देशभरातून विविध शेतकरी संघटनांनी आंदोलने करत केंद्र सरकारचा निषेध केला होता. अखेर केंद्र सरकारने हे कृषी कायदे मागे घेतल्यामुळे हा स्वातंत्र्यानंतरचा कृषिप्रधान भारतातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या एकजुटीचा फार मोठा विजय आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नागरिकांना साखर वाटून या निर्णयाचा आनंद साजरा केला.
शेळके पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना या विषयासाठी फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. घरदार, संसार सोडून अनेक शेतकऱ्यांना त्यासाठी आंदोलन करायला लागली होती. सरकारने पोलिसांच्या बळाचा वापर केला. मात्र तरीही शेतकरी मागे घेतले नाहीत. काही ठिकानी शेतकऱ्यांचा प्राण गेला. अखेर केंद्र सरकारला सुबुद्धी घेऊन हे तीन कायदे मागे घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
यावेळी संघटनेचे हेमंत राव खरात विजय चव्हाण संजय जाधव, रामभाऊ मोरे, सुभाष नलवडे, सचिन सकुंडे उपस्थित होते.