दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । फलटण । भारतीय जनता पार्टीने पाच पैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल फलटण तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये ढोल – ताशे वाजवुन जल्लोष करण्यात आला.
फलटण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जल्लोषास सुरुवात करण्यात आली.
ढोल – ताशांच्या गजरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जयघोषात जल्लोष साजरा करण्यात आला.
देशामध्ये मोदी सरकार आल्यापासून विकासाच्या मार्गावर देशाची वाटचाल सुरू आहे. उत्तर प्रदेश मध्ये कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगी सरकारने चांगले काम केले. गोरगरीब जनतेला मोफत अन्नछत्र मोफत, आरोग्य सेवा, धान्य वाटप, रस्ते विकास इतर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे जनतेने घराणेशाही व गुंडगिरी करणाऱ्या विरोधकांना चपराक दिली. भविष्यामध्ये तसे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसतील व येणाऱ्या सर्व निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या हाती मिळतील, असे मत भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाचे गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोव्यामध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्यात मोठे योगदान आहे. त्यांचाही सातारा जिल्हा भाजपाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
चार राज्यांमध्ये जसा विजय भाजपने घेतला आहे तसंच विजय आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नेतृत्व वाढवावे. यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आता पासूनच कामाला सुरुवात करणे गरजेचे आहे. भविष्यातल्या सर्व निवडणुका आपण जिंकणार आहोत, असे मत माजी नगरसेवक अनुप शहा यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, राज्य युवा मोर्चाचे संघटक सुशांत निंबाळकर, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, माजी नगरसेवक डॉ. प्रविण आगवणे, जिल्हा सचिव मुक्ती शहा, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ. उषा राऊत, किसान मोर्चाचे शहराध्यक्ष नितिन वाघ, सरचिटणीस संतोष सावंत, उपाध्यक्ष संदिप नेवसे, सुधीर जगदाळे, युवा मोर्चाचे नितिन जगताप, किरण राऊत, राजेश हेंद्रे, युवा नेते सागर शहा, ओंकार शेंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.