स्थैर्य, फलटण : श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था लि., फलटणचे (श्रीराम बझार) जनरल मॅनेजर जयराम विश्वनाथ राजमाने यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी आज (शनिवार) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
श्रीराम बझारच्या स्थापनेपासून (सन १९८७) गेली ३३ वर्षे बझारच्या व्यवस्थापनात आणि सन १९९५ पासून गेली २५ वर्षे जनरल मॅनेजर म्हणून त्यांनी संचालक मंडळ, अधिकारी/कर्मचारी आणि ग्राहक यांचा योग्य समन्वय कायम ठेवून बझारच्या प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याने मोठी गरुड झेप घेतली होती.
अत्यंत शांत, संयमी, कार्यकुशल असा प्रशासक जयराम राजमाने यांच्या आकस्मिक निधनाने गमावला आहे. सर्वांशी आपुलकी आणि प्रेमाचे संबंध जपण्यासाठी प्रयत्नशील असलेले हे कृतीशील व्यक्तिमत्व श्रीराम बझारचे संस्थापक स्व. हणमंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले होते.
स्व. हणमंतराव पवार यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असताना श्रीराम बझारची स्थापना केली त्यावेळी १२ तरुण मुलांची टीम खास प्रशिक्षणासाठी वारणानगर येथे पाठविली त्यामध्ये स्व. जयराम राजमाने यांचा समावेश होता.
आज (शनिवार) सकाळी शेरेवस्ती, मठाचीवाडी, ता. फलटण येथील निवासस्थानातून नेहमी प्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर काही मिनिटात अचानक चक्कर येऊन खाली पडलेल्या स्व. राजमाने यांना तातडीने फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांना वाचविण्यात डॉक्टर अपयशी ठरले. मठाचीवाडी या त्यांच्या गावी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी श्रीराम बझारच्या मुख्य कार्यालयात काही वेळ ठेवण्यात आले होते.
बझारचे चेअरमन जितेंद्र पवार, व्हा. चेअरमन दिलीपसिंह भोसले व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह फलटण व परिसरातील असंख्य ग्राहकांनी अंत्यदर्शन घेतले.
श्रीराम बझारची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळून त्यांनी स्वतःची शेती चांगली केली आहे, एक प्रगतशील शेतकरी म्हणूनही ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि भाऊ, भावजय असा परिवार आहे.