स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार परराज्यातील मजुरांना एस टी महामंडळाच्या बस मधून त्यांच्या गावी सोडण्या कामी फलटण एस टी आगारातील सुमारे 63 चालकांनी योगदान दिले. आपल्या जिवाची पर्वा न करता या चालकांनी मजुरांना आपल्या गावी सुरक्षित पोहोच केले. फलटण आगारातुन गुलबर्गा, सैदवा, मध्य प्रदेश सिमा, देवरी, साकोरी, यवतमाळ, धुळे या ठिकाणी प्रवाशांना सुखरुप पोहोच केले. यानिमित्त जैन सोशल ग्रुप फलटणने या चालकांचा कोव्हीड योध्दा म्हणून नुकताच गौरव केला. सोशल डिस्टंसिंग पाळून प्रातिनिधिक स्वरूपात सुमारे दहा चालकांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संतोष गांधी, सचिव डॉ. ऋषिकेश राजवैद्य, खजिनदार श्रीपाल जैन, इव्हेंट चेअरमन अजित दोशी, कोऑर्डिनेटर राजेंद्र कोठारी, फलटण आगाराचे प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, स्थानक प्रमुख राजेंद्र वाडेकर, सहाय्यक वाहतुक निरीक्षक धीरज अहिवळे, वाहतूक नियंत्रक अमोल वडगावे, एस टी सोसायटीचे चेअरमन राहुल कदम उपस्थित होते. या सत्कार समारंभा बद्दल सत्कार मूर्ती चालकांनी जैन सोशल ग्रुपच्या उपक्रमाचे आभार मानले.
यावेळी बोलताना आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी कोव्हीड १९ मुळे कोणीही घराबाहेर पडत नव्हते अशा कठीण प्रसंगी फलटण आगारातील शुर चालकांनी आपला जीव धोक्यात घालून मजुरांना आपल्या गावी सुरक्षित पोहोच केले. ते खऱ्या अर्थाने योद्धे आहेत म्हणून जैन सोशल ग्रुप ने त्यांचा कोव्हिड योध्दा म्हणुन सन्मान पत्र देऊन त्यांचा उचित सन्मान केला आहे, असे प्रतिपादन करून जैन सोशल ग्रुपचे आभार मानले. यावेळी स्थानक प्रमुख राजेंद्र वाडेकर यांनी सर्व सत्कारमूर्ती चालकांचे अभिनंदन करून चालकांनी एस टी महामंडळाच्या नविन मालवाहतूक योजनेस असेच सहकार्य करावे, असे आवाहन केले. श्रीपाल जैन यांनी प्रास्ताविक केले तर डाॅ. ऋषिकेश राजवैद्य यांनी आभार प्रदर्शन केले