
स्थैर्य, फलटण, दि. २६ ऑक्टोबर : गेली दहा ते पंधरा वर्षे फलटण बस स्थानकावर स्वच्छतेचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा दिवाळीनिमित्त जैन सोशल ग्रुप, फलटण तर्फे साडी आणि फराळ देऊन सन्मान करण्यात आला. या ‘स्वच्छता दूतां’च्या कार्याचा गौरव करून त्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
फलटण आगाराचे स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे आणि वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे यांच्या हस्ते या महिला कर्मचाऱ्यांना साडी आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव नीना कोठारी, उपाध्यक्ष प्रीतम शहा, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी आणि संगिनी फोरमच्या माजी अध्यक्षा अपर्णा जैन उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाला महान संबोधले. ते म्हणाले की, जैन सोशल ग्रुप नेहमीच या कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेतो आणि त्यांचा वेळोवेळी उचित सत्कार करतो, ही कौतुकास्पद बाब आहे.
जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन यांनी या कर्मचाऱ्यांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच फलटण आगाराने ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक’ स्पर्धेत राज्यात उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय बक्षीस मिळवले होते”. त्यांच्यामुळेच आगार स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.
या अनपेक्षित सन्मानामुळे भारावलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जैन सोशल ग्रुपचे मनःपूर्वक आभार मानले आणि धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ओम जैन यांनी केले.

