
स्थैर्य, गोखळी, दि. 17 ऑगस्ट : श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने गोखळी (ता. फल्टण) येथील जय हनुमान दहीहंडी संघातर्फे आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ‘जय हनुमान बाल गोविंदा पथका’ने ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोरील दहीहंडी फोडली.
यानिमित्ताने गावात १० ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात दररोज काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि हरिजागर असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. १५ ऑगस्ट रोजी रात्री ह.भ.प. ब्रम्हामहाराज बोडके (नांदेड) यांचे काल्याचे कीर्तन झाले.
दहीहंडी फोडल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करून या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

