स्थैर्य, पुणे, दि. १३ : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या मनाचा मोठेपणा नुकताच मावळवासीयांना अनुभवायला मिळाला. झाले असे की, जॅकी यांच्या घरी काम करणा-या महिलेच्या आजीचे निधन झाले. ही बातमी समजल्यावर जॅकी तिच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी थेट पुण्याजवळील मावळ तालुक्यातील पवनानगर येथील तिच्या घरी पोहचले होते. दीपाली तुपे असे जॅकी यांच्या घरी काम करणा-या महिलेचे नाव आहे. तिच्या आजी तान्हाबाई ठाकर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर जॅकी यांनी घरी जाऊन संपूर्ण कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी जॅकी श्रॉफ हे थेट जमिनीवर बसले आणि परिवाराची विचारपूस करत सांत्वन केले. जॅकी श्रॉफ यांच्या भेटीमुळे ठाकर कुटुंबीय भारावून गेले होते.
पुण्यातील मावळ येथील चांदखेड येथे जॅकी श्रॉफ यांचा बंगला असून ते कायम येथे मुक्कामाला जात असतात. त्यांच्या याच घरी दिपाली तुपे या काम करतात.