स्थैर्य, सातारा, दि. २५ : आर्थिक मंदी, स्पर्धा आणि बेरोजगारीच्या काळात तीन होतकरु युवक एकत्र येवून नवीन उद्योगाचा पाया रोवतात, ही एक आदर्शवत आणि अभिमानास्पद बाब आहे. युवकांनी जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर स्वत:च्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज असून त्यातूनच निर्माण झालेली जे.एम. एन्टरप्रायजेस ही संस्था अल्पावधीत नावलौकिक मिळवेल असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
स्वप्नील जाधवराव, जगतनारायण दुबे आणि दिनेश गायकवाड या तीन सुशिक्षित मित्रांनी धाडसी पाऊल उचलत जे.एम. एन्टरप्रायजेसच्या रुपाने व्यवसायात पदार्पन केले असून या कंपनीच्या माहितीपत्रकाचे अनावरण आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्ञानदेव रांजणे, राजेंद्र जाधव, महेंद्र जाधव, जितेंद्र जाधव, विश्वजीत बर्गे, राहुल तांबोळी, जितेंद्र वारागडे, अभिजित जाधव, अनमोल जाधव, अजय माळवदे, गणेश बगाडे, सनि कांबळे आदी उपस्थित होते.
कनिष्ठ ते वरिष्ठ पदावरील कुशल, अकुशल कामगार पुरवठा, हाऊसकिपींग, कारखाने, व्यवसायिक संकुल, दवाखाने, शाळा, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शॉपिंग मॉल आदी वास्तूंमध्ये साफसफाई, निर्जंतुकीकरण अशी कार्ये मशीन आणि कुशल कामगारांच्या मार्फत करणे, विविध प्रकारच्या आर्थिक संस्था, व्यवसाय यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक पुरवणे, रुग्णांसाठी काळजीवाहू कर्मचारी, अत्यावश्यक सेवा, परिचारिका, परिचारक तसेच स्वच्छता यासारख्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवा, औद्योगिक क्षेत्रातील सर्वप्रकारची बांधकामे, इमारतींचे रंगकाम तसेच कोणत्याही पध्दतीचे दर्जेदार बांधकाम करणे आदी सेवा जे. एम. एन्टरप्रायजेस मार्फत दिल्या जाणार आहेत.
तीनही युवकांनी चांगला निर्णय घेवून व्यवसायात पदार्पण केले आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून तिघांच्या कुटूंबांची भरभराट होईल आणि लोकांनाही चांगली दर्जेदार सेवा मिळेल यात शंका नाही, अशा शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शुभेच्छा दिल्या. श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिन्ही मित्रांना या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.