दबाव टाकून संचालक झालेल्यांना घरी बसविण्याची वेळ आली आहे; आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची उदयनराजे यांच्यावर नाव न घेता टीका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२१ | सातारा | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्यात राजकारण चांगलंच रंगलंय. बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी दंड थोपटले आहेत. जिल्हा बँकेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्यांनाच सभासदांनी मतदान करावे. केवळ जागा अडविण्यासाठी आणि सातारा जिल्हा बँक ही देशातील सहकारातील मोठी संस्था आहे. म्हणून, मला तेथे गेले पाहिजे. यासाठी मागील वेळी दबाव टाकून संचालक झालेल्यांना आता घरी बसविण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून केली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी सर्वच दिग्गज नेते अर्ज दाखल करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सहभागी असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आज अर्ज दाखल केला . त्यापूर्वी त्यांच्याशी सुरूची या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी संवाद साधला. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, गेली पाच वर्षे सातारा जिल्हा बँकेत भाऊसाहेब महाराजांच्या नंतर संचालक व अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. गेली पाच वर्षे बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालले. देशात व राज्यात बँक कायम एक नंबरला राहिलीय. यावेळच्या निवडणुकीत सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, तसेच आमदार मकरंद पाटील, शशीकांत शिंदे असे मिळून जे पॅनेल होत आहे. त्यामुळे बँकेच्या सभासदांच्या विश्वासावर आमच्या पॅनेलचा विजय होणार आहे.

कोणी किती टीका टीपण करू देत, कोणी काहीही करू देत, काहीही फरक पडणार नाही. राष्ट्रवादीच्या सर्वसमावेश पॅनेलचा विजय होणार आहे. बँकेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्यांनाच यावेळी सभासदांनी मतदान करावे, असे आवाहन करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, केवळ जागा आडविण्यासाठी आणि जिल्हा बँक देशातील सहकारातील मोठी संस्था आहे, म्हणून मला तेथे गेले पाहिजे. यासाठी मागील वेळी दबाव टाकून संचालक झालेल्यांना आता घरी बसविण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका त्यांनी उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून केली. उदयनराजेंचा निर्णय खासदार शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार व सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे करतील, असंही त्यांनी सांगितलं.


Back to top button
Don`t copy text!