स्थैर्य, फलटण, दि. २३ : जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार सुमारे दीड पावणे दोन महिन्यानंतर आज फलटणची संपूर्ण बाजार पेठ खुली करण्यात आल्याने व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले असले तरी जीवनावश्यक वस्तू शिवाय अन्य कोणत्याही दुकानात गर्दी दिसून आली नाही, मात्र बाजार पेठेत चार चाकी व दुचाकी वाहनांची प्रचंड वर्दळ वाढल्याचे दिसून आले. बाजार पेठेतील या वाढत्या वर्दळीमुळे सोशल डिस्टनसींग, मास्कचा वापर आणि गर्दी याला फाटा दिला गेला तर पुण्या मुंबईतून जवळ आलेला करोना शहर व तालुक्यात झपाट्याने फैलावण्याचा धोका लक्ष्यात घेऊन प्रत्येकाने योग्य खबरदारी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही अशी भीती जाणकार व्यक्त करीत आहेत.
सस्तेवाडी, ता. फलटण येथील रहिवाशी असलेल्या परंतू मुबईतुन विना परवाना गावाकडे आलेल्या कुटुंबातील पती-पत्नी करोना पॉझीटीव्ह असल्याचा अहवाल काल दि. २१ रोजी प्राप्त झाल्याची माहिती प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. विना परवाना मुंबई येथून गावात दाखल झालेल्या या कुटुंबाला शेती शाळा, फलटण येथील विलगीकरण कक्षात ३ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते, त्यापैकी पती-पत्नीस इतर आजार असल्याच्या संशयावरुन घशातील स्रावाचा नमुना घेण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पाठविण्यात आले होते, त्यांचा अहवाल वरीलप्रमाणे प्राप्त झाल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी कळविले आहे.