सेवारस्ताच खड्ड्यात गेल्यामुळे अपघातांची मालिका पाहण्याची वेळ येणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि. 20 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणार्‍या खेड, ता. सातारा गावच्या कमानीलगत सेवारस्त्यावर साधारण अर्धा फुटापेक्षा अधिक खोल 5 ते 6 मोठे खड्डे पडल्यामुळे इथे मरण फुकटात मिळते असे म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. येथील सेवारस्ताच खड्ड्यात गेल्यामुळे त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास कोरोनानंतर या ठिकाणी सातारकरांना अपघातांची मालिका पाहण्याची वेळ येणार असल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

गेली काही वर्षे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी अद्याप उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत. ही  कामे रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून सुरू आहेत. सातारा जिल्ह्याच्या हद्दीपुरता विचार करायचा झाल्यास यापूर्वीही महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहनचालकांसाठी मूलभूत सुविधांची वानवा, पिण्यासाठी पाणी, शौचालय आदी अनेक मुद्दे वेळोवेळी उपस्थित झाले होते. सुमारे सहा ते आठ महिन्यांपूर्वी सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याप्रश्‍नी आक्रमक पवित्रा घेतला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे सातत्याने ते पाठपुरावा करत होते.

दरम्यानच्या काळात जिल्ह्यात टोल विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली.  महामार्गावर सुविधा नाहीत तर टोल नाही अशी रास्त भूमिका या समितीने घेतल्याने रिलायन्स कंपनीच्या अधिकार्‍यांची  तारांबळ उडाली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या पुढाकाराने त्यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महामार्गावरील समस्यांसंदर्भात पाढा वाचत रिलायन्सच्या अधिकार्‍यांची बोलतीच बंद केली होती. हा घटनाक्रम पाहता पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला चांगले दिवस येतील अशी  आशा निर्माण झाली होती.

22 मार्च 2020 रोजी सातारा जिल्ह्यात  लॉकडाउन जाहीर करण्यात आला.  गेल्याच आठवड्यात सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने तांडव केले. आभाळ फाटले की काय अशी परिस्थिती  निर्माण झाली होती. या मुसळधार पावसामुळे महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर यायला मदत झाली. महामार्गावरील खड्ड्यांच्या समस्यांपेक्षाही सेवारस्त्यांवर पडलेले खड्डे भीषण  आहेत. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खेड, ता. सातारा गावच्या हद्दीत असणार्‍या कमानीनजीक सेवारस्त्यावर अर्धा फूट खोल 5 ते 6 खड्डे पडले असून ते मृत्यूला आमंत्रण देत आहेत.

वाढे फाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट सेवामार्गाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होत असतो. या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते.  या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची तीव्रता कळत नसल्यामुळे दुचाकी चालकांचा कपाळमोक्ष होतो की काय  अशी परिस्थिती  निर्माण झाली आहे. गेले अनेक दिवस हे खड्डे जैसे थे  असल्यामुळे इथे मरण स्वस्त मिळते अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. या खड्ड्यांची तत्काळ डागडुजी न केल्यास कोरोनानंतर या ठिकाणी अपघातांची मालिका पहावी लागते की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.

सातारा जिल्ह्यातील महामार्ग व त्याअंतर्गत असणार्‍या सेवामार्गांची अवस्था अत्यंत बिकट आहे. कोरोनामुळे नागरिक बाहेर पडत नसल्यामुळे अपघातांची संख्या कमी आहे ही वस्तुस्थिती आहे. सातारा शहर हद्दीतील महामार्ग व सेवा रस्त्यांवर पडलेले खड्डे तत्काळ मुजवण्यात यावेत या मागणीसाठी सातारा शहर व तालुका भाजपच्या वतीने शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!