दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । सतारा । श्रीमंत रामराजेंना बैल म्हणा, घोडा म्हणा, असा अजेंडा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यांनीच भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरेंना दिला असेल. त्यामुळे ते बोलत असतील, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी लगावला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे हे जिल्हा दौऱ्यातील सभेत आपल्याला लक्ष्य करत आहेत. मध्यंतरी आपण व्हॉटसॲपवर स्टेटसही ठेवले होते, त्याची राज्यभर चर्चा झाली. याबाबत श्रीमंत रामराजेंना विचारले असता ते म्हणाले, ‘‘व्हॉटसॲप स्टेटस हे २४ तासाच असतं. ते त्यांना किती झोंबलं की नाही, मला माहित नाही. ते एका राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत.
त्यांनी काय बोलाव, हे तुम्ही, मी कोण ठरवणार?. त्यांना जर भारतीय जनता पार्टीने अजेंडा दिला असेल कि, श्रीमंतनं रामराजेंना बैल म्हणा, घोडा म्हणा, असे सांगितले असेल तर ते बोलतात. त्यांना केंद्रीय कार्यालयातून बोलण्यासाठी आदेश आला असेल तर ते बोलत असावेत.’’ जयकुमार गोरे यांनी फलटणच्या सभेत भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या श्रीमंत रामराजेंवर लवकरच कारवाई होईल, असे सांगितले होते. याविषयी श्रीमंत रामराजेंनी ‘ज्यावेळी होईल, त्यावेळी पाहूया’, असे म्हणत या प्रश्नाला बगल दिली.