दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑगस्ट २०२३ | फलटण |
महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचे फलटण हे मोठे केंद्र असून पँथरच्या काळापासून फलटणच्या तरुण कार्यकर्त्यांसह समाजबांधवांनी आपल्याला नेहमी सक्रिय साथ केल्यानेच आपण केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहोचू शकल्याचे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
कालकथित शंकर पवार यांच्या फलटण येथे आयोजित शोकसभेत अध्यक्षस्थानावरून ना. आठवले बोलत होते. यावेळी कालकथित शंकर पवार यांच्या कुटुंबियांसह दत्ता अहिवळे, जय रणदिवे, मंगेश आवळे आणि फलटणमधील आंबेडकरी बांधव उपस्थित होते.
कालकथित शंकर सारखे विविध समाजातील निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभी राहिल्याने पँथरचा झंझावात महाराष्ट्रासह अन्य राज्यात पोहोचला असल्याचे निदर्शनास आणून देत ८०-९० च्या दशकात आपण अनेक कार्यक्रमांसाठी नेहमी फलटण येथे येत असे. केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून लक्षावधी व्यक्ती अन् संस्थांची कामे करता आली. समाज प्रचंड मोठा असल्याने आणि देशभर रिपब्लिकन चळवळ विस्तारल्यामुळे सर्वच ठिकाणी पोहोचता येत नाही. तथापि, सामुदायिक पातळीवरील कोणतेही काम असले अन् कार्यकर्त्यांनी, तरुणांनी चिकाटीने पाठपुरावा केला तर नक्की मोठी कामे उभी राहतील, याची ग्वाही यावेळी ना. आठवले यांनी दिली.
शोकसभेचे नियोजन व व्यवस्था रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फलटण शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते विजय येवले, मधुकर काकडे, संजय निकाळजे, मुन्ना शेख, राजू मारूडा, सतीश अहिवळे, तेजस काकडे, अभिलाष काकडे, प्रवीण शेळके, विमलताई काकडे, राखीताई कांबळे व त्यांच्या सहकार्यांनी केले होते.