स्थैर्य, जळगाव, दि.२१: राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सातत्याने नाकारत आले असले तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यासाठीचा मुहूर्त अखेर सापडला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी ते आणि त्यांच्या कन्या, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे कार्यकर्त्यांसह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाकडून गेल्या साडेचार वर्षांपासून डावलले जात असल्यामुळे एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विशेष राग आहे. पक्षातील केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांना भेटूनही उपयोग झाला नाही, याची त्यांना खंत आहे. विधानसभा, विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने आणि पक्षाच्या संघटनात्मक रचनेतही डावलले गेल्याने त्यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेत्यांशी चर्चा केल्यामुळे या पक्षांतराच्या वृत्ताला पुष्टी मिळाली होती.
खडसेंसाठी मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याचीही वाढली शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर खडसे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असेही विश्वसनीय वृत्त आहे. त्यासाठी मुंबईस्थित एक तरुण मंत्री राजीनामा देतील आणि मुंबईतील पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारतील. शिवाय, पूर्वी प्रशासनात राहिलेले राष्ट्रवादीचेच एक ज्येष्ठ मंत्रीही प्रकृतीच्या कारणाने राजीनामा देण्याची शक्यता असून खडसेंना संधी मिळू शकते.