
स्थैर्य, फलटण, दि. 08 ऑगस्ट : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील करिअर कौन्सिलिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या सहकार्याने, बारामती येथील ‘iStepUp ट्रेनिंग अँड प्लेसमेंट’ संस्थेच्या वतीने विशेष ‘आयटी जॉब ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. केवळ फ्रेशर्ससाठी आयोजित केलेला हा ड्राईव्ह मंगळवार, दि. १२ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट विभागात सकाळी १० वाजता होणार आहे.
आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि ऑटोमेशनमुळे अनेक कंपन्यांमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांची कपात होत असली तरी, नवीन तंत्रज्ञान अवगत असलेल्या कुशल फ्रेशर्सची मागणी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना नोकरीची पहिली संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या जॉब ड्राईव्हमध्ये आयटी आणि नॉन-आयटी अशा दोन्ही क्षेत्रांतील संधी उपलब्ध आहेत. यामध्ये खालील प्रमुख पदांचा समावेश आहे:
- फुल स्टॅक डेव्हलपर
- डेटा सायन्स
- डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
- इंटर्नशिप आणि एंट्री-लेव्हलच्या विविध संधी
अनेक विद्यार्थी मुलाखतीला सामोरे जाण्यास घाबरतात, मात्र अपयशाची भीती न बाळगता स्वतःच्या क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. पात्र विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि इंटर्नशिपची संधीही मिळू शकते. ही संधी महाविद्यालयातच उपलब्ध झाल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या जॉब ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी
https://forms.gle/Q4y2RJM4kCUHkbSV7 या लिंकवर नोंदणी करावी, असे iStepUp संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.