महिला सक्षमीकरण हीच सावित्रीबाई फुलेंना आदरांजली – सौ. वेदांतिकाराजे; अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर अभिवादन कार्यक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०६ जानेवारी २०२२ । सातारा । सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्यांच्यामुळेच आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. ग्रामीण भागातील आणि तळागाळातील स्त्री शिक्षित आणि सक्षम झाली पाहिजे. महिला सक्षमीकरण हीच सावित्रीबाई फुले यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

अजिक्यतारा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षक दिनाच्या निमित्ताने अजिंक्य उद्योग समुहातील
कार्यरत सर्व महिला कर्मचारी यांचा सन्मान सोहळा विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट व कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे सेकेटरी जिवाजी मोहिते, सौ. वैशाली मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, असंख्य अडचणींवर मात करून सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाचा पाया रचला. प्रतिकुल परिस्थितीमध्येसुध्दा शिक्षणाचे कार्य त्यांनी अविरतपणे चालू ठेवले. सावित्रीबाईंच्या कार्याचा आदर्श घेवून महिलांनी स्वतः सक्षम, स्वयंभू, सबल बनले पाहिजे. तसेच महिलांनी महिलांचा आदर राखला पाहिजे. तरच समाजात स्त्रियांची मान उंचावेल.

जिवाजी मोहिते म्हणाले, आज स्त्रिया कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत. कृषी क्षेत्रापासून ते अंतराळ क्षेत्रापर्यत महिलांनी स्वत:चे स्थान निर्माण केलेले आहे. स्त्रियांनी स्वत:ला अबला न समजता सबल होवून पुढे आले पाहिजे. पुरूषांनी महिलांना स्वत:च्या कार्याचा ठसा उमटविण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.

यावेळी सतिश यादव, वैशाली दिघे, सौ. गीता नरे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे प्राचार्य संजय नलावडे यांनी प्रास्ताविक केले.
ज्युनियर विभाग प्रमुख महेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास अजिंक्यतारा माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक व बालकमंदिर विभागातील सर्व शिक्षक, सेवक, सहकारी, कारखान्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!