दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२२ । अमरावती । लोकसेवेच्या उदात्त हेतूने संत गाडगेबाबांनी मिशनची स्थापना केली. मिशनचे हे कार्य अविरत चालू ठेवून संत गाडगेबाबांनी दिलेला लोकसेवेचा वसा जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्ष ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दर्यापूर येथे केले.
श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचालित दर्यापूर येथील श्री संत गाडगे महाराज बालसुधारगृहाच्या इमारतीचा जीर्णोद्धार पालकमंत्र्यांनी स्वखर्चातून केला. सुधारणेनंतर नवे रूप प्राप्त झालेल्या इमारतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार बळवंतराव वानखडे, मिशनचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, हरीभाऊ मोहोड, बालसुधारगृहाचे व्यवस्थापक गजाननराव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, संत गाडगेबाबांनी दुर्बल, अनाथ, अपंगांसाठी आयुष्य वाहून घेतले. त्यांच्या दशसूत्री संदेशानुसार तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी कार्य अविरत होत राहणे आवश्यक आहे. मिशनचे हे कार्य एकजुटीने पुढे नेऊया. संत गाडगेबाबांची शिकवण जपून त्यानुसार वाटचाल करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन त्यांनी केले.
बालसुधारगृहाला 75 वर्षे पूर्ण झाली. ही इमारत मोडकळीला आली होती. पालकमंत्र्यांनी स्वखर्चातून जीर्णोद्धार केला. हे काम लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांनी लक्ष घालून पाठपुरावाही केला. त्यामुळे इमारतीला नूतन रूप लाभले आहे, असे आमदार श्री. वानखडे यांनी सांगितले.
इमारतीच्या नूतनीकरणासाठी योगदान देणा-या मूर्तिकार गोपाळ पवार, सलीमभाई, सुभाष पनपालिया, देवानंद फुके, सुरेश गारोळे, भैय्या पाटील भारसाकळे आदींना यावेळी गौरविण्यात आले.