
स्थैर्य, सातारा, दि. 26 : विषाणूच्या प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर ग्रामस्तरीय समित्यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरत आहे. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सचिव, बचत गट, ग्रामसंघ अशा अनेकांचा ग्रामस्तरीय समितीमध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. ग्रामस्तरीय समितीने तिच्या जबाबदार्या उत्कृष्टपणे पार पाडल्या पाहिजेत हे जरी खरे असले तरी लोकांचा सुद्धा सहभाग आणि प्रतिसाद व्यवस्थित असला पाहिजे. विलगीकरण राहणे म्हणजे कुठलीही शिक्षा नाही किंवा समाजापासून लांब ठेवण्याचा तो प्रकार नाही, तर देशाची सेवा करण्याचा एक सुंदर मार्ग. खरेतर सुंदर संधी आहे …!.
विलगीकरणमुळे स्वतःचा कुटुंबाचा आणि संपूर्ण गावाचा धोका कमी होतो. कोणी रोगग्रस्त आहे म्हणून गावाच्या बाहेर ठेवले असा विचार अजिबात करू नये. उलट आपल्यामुळे गावाची आणि देशाची प्रत्यक्ष सेवा घडत आहे असा विचार करावा. नुकताच आपण पंचायती राज दिवस साजरा केला त्याचेही महत्त्व मोठे आहे. या पार्श्वभूमीवर या संकटातून पार होण्यासाठी अनेक नागरिक पुणे मुंबई तसेच इतर गावाहून आपापल्या गावी आले आहेत. या सर्वांनी समजुतीने वागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रशासनाने सर्व त्या सूचना दिल्या आहेत. वैयक्तिक काळजी घेण्याबरोबरच विलगीकरण काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. ते न पाळल्यास दंड आकारला जाणार आहे. परंतु महत्वाचे हे आहे की गावाची आणि देशाचे भले करायचे असेल तर दंड करण्याइतपत वेळच येऊ देऊ नये. मला विलगीकरण का अशा पद्धतीने कोणी गाव समित्यां बरोबर हुज्जत घालू नये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीला पूर्ण सहकार्य करावे असे प्रशासन आवाहन करीत आहे.
पंचायती राज दिवस साजरा करत असताना जेवढा आनंद होतो, तेवढा आनंद क्वचितच होतो. कारण आपलं राज्य आपण चालवावं हा विचारच कितीतरी मोठा आहे. 1993 मध्ये 73 व्या घटनादुरुस्तीने गावांना खूप छान अधिकार दिले. अगदी राज्य आणि केंद्र सरकारला असतो, तसा दर्जा गावांना मिळाला.सरपंच आणि त्याचे सहकारी यांना जणू गावाचा विकास करण्याचे सगळे अधिकार मिळाली. स्वतःच्या मनाप्रमाणे आपल्या गावालाच एक राज्य समजून विशिष्ट निर्णय घेण्याचे अधिकार मिळाले. महात्मा गांधी म्हणाले होते, “खेड्याकडे चला” त्या घोषणेमध्ये खूप मोठा अर्थ होता. आजच्या संकटाच्या काळात सुद्धा लक्षात येत आहे की गावाचे महत्व किती मोठे आहे. आपण गावाचे मालक नाही तर विश्वस्त आहोत अशा भावनेने सरपंच तसेच सर्व सदस्य यांनी इतरांना बरोबर घेऊन काम करणे अपेक्षित आहे. सरपंचासह सर्वांना विशिष्ट सन्मान हा मिळतोच. अलीकडेच आपण सन्माननीय पोपटराव पवार यांचे उदाहरण पाहिले. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले. याचा सर्व महाराष्ट्राला नव्हे तर भारतालाही अभिमान वाटत असेल. कारण, हा सन्मान गावाला प्रगतीपथावर नेणार्या प्रामाणिक भावनेचा आहे. अशा पद्धतीने विश्वव्यापी विचार केला तर आपले गाव हा एक सुंदर समुदाय बनून राहतो. सर्वांनी एकोप्याने काम केले आणि समजुतदारपणाने काम केले आणि गैरसमज करुन घेतले नाही तर विषाणूच्या प्रादुर्भाव संकटावर आपण लवकरच मात करणार आहोत. कोणतीही वैयक्तिक अथवा घरगुती, सामाजिक हेवेदावे सध्याच्या काळात पूर्णपणे विसरून जावेत. कारण हे कोणत्या गावाचे नव्हे तर राष्ट्रीय संकट आहे. खरेच आज चहुबाजूंनी अनेक आव्हानांचा आपण सामना करीत असताना गावाला स्वयंपूर्ण आणि आनंददायी करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशिष्ट पद्धतीने विचार केला आणि पावले उचलली तर गावाची सर्वांगीण प्रगती आहे त्या परिस्थितीत करणे सहज शक्य आहे. त्यासाठी गावात ऐक्य भावना निर्माण व्हायला हवी. गावातील तरुण मुले, लहान मुले, स्त्रिया, वृद्ध अशा सर्वच घटकांना विश्वासात घेऊन विकासाची पावले टाकली तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावाचे नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. हे निश्चित आहे. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा तर आपल्याला हव्याच आहेत. मात्र त्यापलीकडे जाऊन बेरोजगारी, गुन्हेगारी, व्यसनाधीनता याबाबत काय विचार करता येईल याचे सखोल मंथन खूप छान पद्धतीने गाव पातळीवर करण्याची गरज आहे. प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, छोटे-मोठे सरकारी बिगर सरकारी कर्मचारी अशा सर्व घटकांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांच्याशी चर्चा करून सरपंच आणि त्याच्या सहकाऱ्यांनी छान मार्ग काढायला हवा. विषाणूच्या संकटावर कशी मात करायची याबाबत जनजागृती देखील गरजेची आहे. सुशिक्षित व्यक्तींनी याबाबत पुढाकार घ्यायला हवा. सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंसेवकांनी याबाबत पुढे यावे आणि गावात अत्यंत जबाबदार व्यक्ती म्हणून प्रबोधन करावे अशी अपेक्षा आहे. सर्वांगीण प्रगतीमध्ये मूलभूत सुविधा आणि संस्कारात्मक वातावरण या दोन्हींचा समावेश होतो. केवळ भौतिक विकास करून उपयोग नाही हे सरपंच राजाने जाणले पाहिजे. अनेक वेळा असा अनुभव गावात खूप विकास झाला आहे, परंतु गाव ऐक्याच्या पातळीवर आनंदात नाही. जो-तो आपले पहात आहे. सुख दुःखात सहभागी नाही. तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत नाहीत. लहान मुला-मुलींच्या संस्कारांवर शाळेतच विचार केला जातो. गाव पातळीवर त्यासाठी विशेष उपक्रम होत नाहीत. तरुण तरुणींशी संवाद साधला जात नाही. हे सर्व जर होत असेल तर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या स्वप्नातील खेडे खूप दूर राहिले आहे, असे म्हणावे लागेल. म्हणूनच भौतिक विकास आणि संस्कार यांचा मिलाफ माननीय सरपंच आणि त्यांचे सहकारी यांना घालावा लागेल. त्यामुळे गावात केवळ सुबत्ता नव्हे तर आपलेपणा आणि माणुसकीचे नंदनवन फुलेल. वेगवेगळ्या स्पर्धा घेणे, सतत तरुणांशी संवाद साधणे, यशस्वी व्यक्तींना गावात निमंत्रण देणे, आदर्श गाव पुरस्कार मिळालेल्या गावांना संपूर्ण गावाने टप्प्याटप्प्याने भेट देणे असे उपक्रम करायला हवेत.
पक्षीय पातळीवरील भूमिका योग्य ठिकाणी सोडून दिली पाहिजे. जुन्याजाणत्या लोकांचे अनुभव लक्षात घेऊन गावाचा विकास करायला हवा. गावात वाचनालय हवे.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्हायला हवे.याबाबत सरपंच आणि त्यांचे सहकारी यांनी गावातील हुशार विद्वान आणि समाजशील व्यक्तींना विश्वासात घ्यावे. संपूर्ण गावात प्रेमाने वावरावे. प्रत्येकाला हा आपला नेता प्रिय वाटला पाहिजे. एकदा निवडणूक झाल्यावर ते टेन्शन आणि तो विरोध पूर्णपणे मावळायला हवा. सर्व जाती, सर्व धर्म, सर्व पंथ या सर्व लोकांना एकत्र घ्यायला हवे. मुळातच सरपंचांना व त्यांच्या सहकाऱ्यांना व्यसनाधीनतेपासून गावाला दूर ठेवण्याचे मोठे आव्हान प्रथम स्वीकारावे लागेल. नवीन पिढी ढाबा आणि बियर यांच्या नादाला लागत आहे ही गंभीर बाब आहे. मोबाईलचा अतिवापर, सतत वाहनांचा वापर, ज्येष्ठांची संवाद साधण्याचा अभाव या गोष्टी तरुणांमध्ये दिसत आहेत त्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत. आसपासच्या गावातील समाजसेवक आणि हुशार व्यक्तींशी संपर्कात रहावे. यामध्ये कोणताही कमीपणा समजू नये. सतत संवाद साधावा. संत, समाजसेवक, समाजसुधारक यांच्या विचारांचा जागर गावात पाहायला हवा.व्याख्याने घ्यावीत. स्पर्धा घ्याव्यात तालुका स्तरावर विस्तार अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्याशी सतत संवाद साधावा. त्यांना प्रेमाने गावात बोलवावे त्यांच्याकडून सल्ला, मार्गदर्शन घ्यावे. बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांचा सन्मान करावा. गावातील एकही व्यक्ती उपाशी झोपू नये, याची काळजी घ्यावी. आपल्या कोणत्याही माय बहिणीला नवऱ्याच्या दारू पिण्यामुळे त्रास होत नाही ना याची खबरदारी घ्यावी. सरपंच माझा भाऊ आहे, सदस्य माझे भाऊ आहेत अशी भावना प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी, प्रत्येक सून हिच्या मनात आनंदाने नांदली पाहिजे. नुसताच गाडी, बंगले, रस्ते, पाणी आणि वीज असा विकास उपयोगाचा नाही. नाहीतर सुप्रसिद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी म्हटल्याप्रमाणे, “इमारती उंच झाल्या आणि माणसे खुजी झाली” अशी अवस्था होईल. महात्मा गांधी, विनोबा भावे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्वच महान व्यक्तींनी स्वप्नात पाहिलेले खेडे निर्माण करणे अवघड नाही. पंचायती राज दिवसानिमित्त असा संकल्प करूया. संवेदनशील माणूस निर्माण करणे. प्रत्येक गावकरी दुसऱ्याच्या दुःखात सहभागी झाला पाहिजे, असे वातावरण निर्माण करणे हेच खरे तुमचे यश असेल….! शासन, प्रशासन यांच्या सर्व सूचना पाळणे, जनजागृती करणे, आयुर्वेदिक उपाय सुद्धा अवलंबणे आणि त्याबाबतीत घरोघरी माहिती देणे या सर्व जबाबदाऱ्या ग्रामस्थ, समिती, सुशिक्षित नागरिक आणि बाहेरुन आलेले नागरिक या सर्वांनी समन्वयाने पार पाडायच्या आहेत.विलगीकरण होत असताना अत्यंत समजूतदारपणे वागणे गरजेचे आहे. ग्रामस्तरीय समिती त्यांच्या जबाबदाऱ्या योग्य पार पाडायलाच हव्यात तसेच त्यांनी बाहेरून आलेल्या नागरिकांना सन्मानाची, आदराची आणि समजूतदारपणाची वागणूक द्यावी. तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांनी विलगीकरण म्हणजे कमीपणा न समजता राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडावे, अशी नम्र विनंती आहे.