दैनिक स्थैर्य । दि. २७ जुन २०२१ ।फलटण । मराठा समाज व ओबीसी समाजाचे आरक्षण घालविण्याचे पाप सध्याचे सरकारने केले असल्याने या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी सरकारने सत्ता सोडावी. स्थानिक स्वराज्य संस्थातील धोक्यात आलेले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करणेबाबत, मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणेबाबत आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवार दि. २६ जून रोजी चक्का जाम आंदोलन करुन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना निवेदन देण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे वतीने महाराष्ट्र राज्यात आज शनिवारी एकाच दिवशी चक्का जाम आंदोलन आयोजित करुन निवेदन देण्यात आली, त्याचाच एक भाग म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली फलटण येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील चौकातील संत सावता महाराज मंदिर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टिका करुन सरकार लोकांनी लवकरच खाली खेचले पाहीजे.
प्रारंभी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष आरक्षणासंबंधी सविस्तर विवेचन करुन राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळेच मराठा व ओबीसी आरक्षण प्रश्न गंभीर बनला असून दोन्ही समाज बांधव एकत्र येऊन एक विचाराने सरकारच्या धोरणाविरुद्ध संघर्ष करीत असून दोन्ही आरक्षणे मिळेपर्यंत हा संघर्ष सुरु राहील किंबहुना तो अधिक तीव्र होईल असा इशारा यावेळी ननावरे यांनी दिला.
भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी समारोप आभार व्यक्त केले, आंदोलनात फलटण तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, डॉ. विजयराव बोरावके, नानासाहेब इवरे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सुशांत निंबाळकर यांचेसह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांतिसिंह नाना पाटील चौकातील चक्का जाम आंदोलना दरम्यान भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध करीत घोषणाबाजी केली.
नरसिंग शिंदे, गोविंदराव भुजबळ, अनिल गायकवाड, बापूराव बनकर, समता परिषद तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भाजपा युवा मोर्चाचे पिंटू इवरे, ऑटोमोबाईल असोसिएशनचे संदीप नेवसे, नाभिक महामंडळाचे बाळासाहेब काशीद, अल्पसंख्याक सेलचे जाकिरभाई मणेर, रियाज इनामदार, शिक्षक आघाडीचे सतीश जंगम सर, महिला आघाडीच्या उषाताई राऊत, व्यापारी संघटनेचे वशिम मणेर, किरण राऊत, महाराष्ट्र राज्य माळी महासंघ व समता परिषद, यशवंत सेना, रासपचे पदाधिकारी, बारा बलुतेदार संघटनांचे पदाधिकारी बहुसंख्येने महिला व ओबीसी बांधव उपस्थित होते.