दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२४ | फलटण | फलटण वरून खुंटेकडे जाणाऱ्या रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असल्याचे बघायला मिळत आहे. मोठ्या खड्यांनि वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. खड्डे चुकवण्याचा नादामध्ये नेहमीची छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहेत. खड्डे चुकवताना एकदा मोठा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी जीव गेल्यावरच खड्डे बुजवणार का ? असा सवाल उपस्थित राहत आहे.
फलटण मधील जिल्हा परिषद उपविभागीय बांधकाम विभाग म्हणजे “खायला कार अन भुईला भार” असा झाला आहे. या विभागाचे अधिकारी म्हणजे फक्त आश्वसनांचा पाऊस व कामापासून टंगळमंगळ करणे हे त्यांचे ध्येय असून लोक वाहने चालवीत असताना दररोज या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नावे शिव्या घालत आहेत. दरम्यान फलटण ते खुंटे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाहने चालविताना वाहनचालक मेटाकुटीला येत असून रस्त्याची झालेली चाळण तुटलेल्या साईडपट्ट्या, खड्ड्यात साठलेले पाणी वाढलेली झाडेझुडपे वेडीवाकडी वळणे यामुळे या रस्त्यावरून येणे जाणे म्हणजे हमखास अपघात तरी किंवा हाडांची व्याधी लागून घेणे अशी झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ताबडतोब या रस्त्यावरील खड्डे व साईडपट्ट्या न भरलेस राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने व ग्रामस्थांना घेऊन मोठे आंदोलन करणार असून या खड्ड्यात वृक्षारोपण करणार आहे.
– राजेंद्र अच्युतराव खलाटे,
उपाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष फलटण तालुका.
माजी उपसरपंच, खुंटे