राज्य शासनाकडून शहिद जवानांच्या वीरपत्नींना शेत जमिनींचे वितरण

शहीद जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करता आली, हे आपले भाग्य : सचिन ढोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑगस्ट २०२३ | फलटण |
महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताहातील ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमांतर्गत शहीद जवानांच्या वीरपत्नींना शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशाने प्रत्येकी २ हेक्टर शासकीय जमीन वितरित करता आली, हे महसूल प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण काम आपण करू शकलो. आज शहीद जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करता आली, हे आपले भाग्य असल्याचे प्रतिपादन फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.

शासनाच्या महसूल सप्ताहानिमित्त दि. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान आयोजित फलटण येथील प्रांताधिकारी व तहसील कार्यालय किंबहुना संपूर्ण महसूल प्रशासनाच्यावतीने दि. १ ते ४ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले असून दि. ५ रोजी आज ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमांतर्गत सैन्य दलातील जवानांच्या कुटुंबियांचा मेळावा व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासह शहीद जवानांच्या वीरपत्नींना प्रत्येकी २ हेक्टर शेत जमीन वितरण आदेश देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी सचिन ढोले बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार सौ. सावंत – बोबडे, महसूल नायब तहसीलदार नामदेव काळे, अव्वल कारकून निलेश भोसले यांच्यासह महसूल कर्मचारी आणि सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.

आपण उपविभागीय अधिकारी फलटण या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला असून कार्यालयातील फाईल्स पाहताना शहीद जवानांच्या वीरपत्नींना शासन निर्णयानुसार जमीन वितरीत करण्याची काही प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल सप्ताहातील ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमांतर्गत सदर प्रकरणे निर्गमित करता आली तर एक चांगला उपक्रम राबविल्याचे समाधान लाभेल, या भावनेतून आपण सदर प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करून घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी पाठविली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महसूल उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी ही चारही प्रकरणे लगेच मंजूर केल्याने आज सदर वीरपत्नींना जमीन वितरण आदेश देता आल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांचे वारस तसेच सैन्यदलात कार्यरत जवान व त्यांचे कुटुंबीय, शहीद जवानांचे वारस यांच्या कोणत्याही अडचणीत त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, आपल्या अडचणी मांडाव्यात. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न व मार्गदर्शन करून त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

महसूल सप्ताहाच्या निमित्ताने तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वीरपत्नींना शासन निर्णयानुसार जमीन देता आल्याबद्दल समाधान व्यक्त करताना स्वातंत्र्यदिनी या जमिनींच्या कब्जेपट्टी तयार करून या वीरमातांना प्रत्यक्ष जमिनीचा ताबा देण्याची ग्वाही दिली.

नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात दि. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहात दि. १ ऑगस्ट रोजी महसूल दिन, दि. २ ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’ उपक्रमांतर्गत शाळा महाविद्यालयातील युवकांशी संपर्क करून त्यांच्याशी सुसंवादाद्वारे त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती देवून त्यांच्या अडचणी जाणून त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दि. ३ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत विविध समाज घटकांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दि. ४ ऑगस्ट रोजी जनसंवाद उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात मेळावे घेऊन लोकांना विशेषत: शेतकर्‍यांना ई – पीक पाहणी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, फेरफार प्रलंबित नोंदी, पाणंद रस्ते, शेतीची प्रकरणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि आज दि. ५ ऑगस्ट रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमांतर्गत वीरपत्नींना जमीन वितरण आणि सैन्य दलातील जवानांच्या कुटुंबियांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांना सहकार्य करण्यात येणार असल्याचे प्रारंभी स्पष्ट केले.

वीरपत्नींना प्रत्यक्ष जमीन वितरण आदेश वितरित केल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना महसूल प्रशासनाच्या कार्यतत्परतेचे आणि सर्वांच्या भावना समजावून घेऊन सहकार्य व मदतीसाठी सदैव सज्ज असल्याच्या कृतीचे प्रत्यक्ष दर्शन घडविणार्‍या होत्या. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर एका सप्ताहाच्या आत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्या केवळ मंजुरीसाठी न पाठविता प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून या प्रस्तावांना मंजुरी घेण्यासाठी केलेले प्रयत्न शहीद जवान यांच्या त्यागाला, बलिदानाला सलाम करणार्‍या असल्याचे अनुभवल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.

ज्यांना जमीन हस्तांतरीत करण्यात आली, त्या वीरपत्नी भवानीनगर राजुरी, ता. फलटण येथील श्रीमती विजया माणिकराव देशमुख यांच्या सुकन्या, मोहाट, ता. जावली येथील श्रीमती वैशाली रविंद्र धनावडे, आदित्यनगरी सातारा येथील श्रीमती पुष्पलता काशीनाथ मोरे, सालपे ता. फलटण येथील श्रीमती मंदाकिनी सुनील कचरे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!