
दैनिक स्थैर्य । 12 मे 2025। सातारा । संपूर्ण जगात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए.आय.चा धुमाकूळ असून भविष्य काळातील ती महत्त्वपूर्ण गोष्ट ठरणार आहे. ए आय तंत्रज्ञानाद्वारे आता शेती करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे शेतकर्यांनी काळानुरूप आपल्या शेतीमध्ये बदल करावा आणि ए आय तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा वापर करावा, असे आवाहन एकसळ येथील सेंद्रिय शेतीतील तज्ञ शेतकरी अमोल भोसले यांनी केले.
राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या पुणे येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा आणि बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना तर्गत कृषी सखी सी.आर.पी प्रशिक्षण कार्यक्रम एकसळ, ता. कोरेगाव येथे रविवारी पार पडला. यावेळी महिला शेतकर्यांशी संवाद साधताना भोसले बोलत होते. एकसळचे माजी सरपंच किरण भोसले, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे, संजय क्षीरसागर यावेळी उपस्थित होते.
शेतीमध्ये अमुलाग्र बदल होत असून शेती हीच पृथ्वीतलावरील महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, याचे भान शेतकर्यांना राहिले नाही. जो तो प्रगत तंत्रज्ञानाच्या मागे फिरत आहे. प्रत्यक्षात मात्र ए.आय. तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली असून शेतीमध्ये त्याचा वापर करणे नितांत गरजेचे आहे, असे सांगत अमोल भोसले यांनी विविध उदाहरणे दिली.
यावेळी कृषी सखी यांनी सेंद्रिय शेतीसह गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली. बांधावरील शेतीची प्रयोगशाळा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. बारामती तालुक्यामध्ये या प्रकारच्या प्रयोग निश्चितपणे करणार असल्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला.