स्थैर्य, मुंबई, दि.१५: भाजपमध्ये बराच काळापासून नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, पडद्यामागे सुरु असलेल्या घडामोडी पाहता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजून याबाबत जाहीरपणे बोलण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना गुरुवारी प्रसारमाध्यमांकडून याविषयी विचारणा झाली. यावर छगन भुजबळ सूचक हसले. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत येणार नाहीत असे नव्हे, अशी मोघम प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. एकूणच भुजबळ यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाची शक्यता नाकारलीही नाही. या सर्व घडामोडींवरून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात त्यादृष्टीने हालचालीही सुरु झाल्या आहेत. खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागू शकते. राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या कोट्यातून खडसे यांना उमेदवारी दिली जाईल.