स्थैर्य, सोलापूर, दि.१९: महाराष्ट्रात कलम ३६५ अर्थात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. महाराष्ट्रात ३६५ चा वापर करणे एवढे सोपे नाही. बहुमत असल्यानंतर कोणीही लगेच सरकार पाडू शकत नाही. त्यामुळे उगाचच अनावश्यक चर्चा करू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकारले.
अजित पवार सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर आहे. अतिवृष्टी व पूरबाधित भागांची ते पाहाणी करत आहेत. सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. सोलापूर जिल्ह्याचा वर्षाचा निम्मा पाऊस एकाच वेळी पडला आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे. त्या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी पोल उभे करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. लोक म्हणतात की राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. पण अजून तशी परिस्थिती नाही. फळबाग आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, असे आदेश अधिका-यांना दिले आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.