दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२३ । मुंबई । अजित पवार यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठेला तडा जाईल असा कुठलाही विषय नाही. चर्चा का होतेय कळत नाही. जर भाजपाकडे विषय नाही, अजित पवारांकडे विषय नाही. मग चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. आजपर्यंत कुठलाही प्रस्ताव आणि किंचित विचारही आमच्यासमोर आला नाही. त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल. कुणाला पक्षात यायचे असेल तर तेव्हा निर्णय घेऊ. आज पक्षासमोर अजित पवारांचा काही विषयच नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले की, जर एखादी घटना त्याकाळात घडली असेल. आमच्याशी विश्वासघात झाला होता. सत्तेची चावी जनतेने आम्हाला दिली होती. बहुमत नसते तर हा प्रश्न कधीही आला नसता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हे जनतेने मतदानातून बहुमत दिले होते. मग तुम्ही फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये याआधारे त्यांच्याशी बेईमानी झाली. त्यामुळे जनतेने ठरवलेले त्यामुळे सरकार बसवण्यासाठी प्रयत्न करणारच ना..त्यामुळे पहाटेचा शपथविधी ही देवेंद्र फडणवीसांची चूक नाही. तो त्या काळातील अपरिहार्य निर्णय होता असं त्यांनी सांगितले.
तसेच जे झाले ते झाले, त्याचा आधार घेऊन अजित पवारांना वारंवार पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही. त्या काळात जे झाले ते झाले. देवेंद्र फडणवीसांनीही खुलासा केला आहे. अजित पवारांना टार्गेट करून त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणे योग्य नाही. अजितदादांबद्दल बाहेर कोण काय बोलले माहिती नाही. परंतु त्यांच्याविषयी कुठलाही अधिकृत प्रस्ताव नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहायला हवी. निकालावर जर-तर चा अर्थ करण्याचे कारण नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, नरेंद्र मोदी हेच भारताला पुढे घेऊन जातील असा विश्वास जनतेला आहे. शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील जनतेसाठी विकास करतेय. विकासाच्या जोरावर आम्ही लोकांसमोर जाणार आहे. २०२४ मध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त लोकसभा जागा जिंकल्या पाहिजेत हे आमचे मिशन आहे. अजित पवारांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण करणार नाही. पक्षात कुणीही आले तरी त्यांचे स्वागत करतो असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.