दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | माहिती व जनसंपर्क विभाग हा केवळ माहिती देण्यासाठी नाही तर, शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी आहे. शासनाची चांगली प्रतिमा तयार करणे ही पारंपारिक माध्यमांसोबतच नवीन समाज माध्यम व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारेही जलदगतीने केली जाऊ शकते. मात्र यात सातत्य असणे आवश्यक आहे. नवीन माध्यम हाताळतांना तांत्रिक आणि आशय निर्मितीबाबतची माहिती असणे गरजेचे आहे. असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रभारी संचालक (वृत्त) श्री.दयानंद कांबळे यांनी व्यक्त केले.
आज विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन येथे “समाज माध्यमांचा सुलभतेने वापर: शासन प्रतिमा” या विषयावर आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण सत्राच्या प्रारंभी ते बोलत होते. या प्रशिक्षण वर्गात पालघर,ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकण भवन येथील अधिकारी/कर्मचारी सहभागी झाले होते.
अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन कामातील गुणवत्ता वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. असे मत वैद्यकीय अधिकारी तथा कोकण भवन राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी डॉ.गणेश धुमाळ यांनी व्यक्त केले. अधिकारी महासंघातर्फे देखील तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी विभागीय माहिती कार्यालयाने पुढाकार घ्यावा असे सुचविले. ऑनलाईन प्रशिक्षण सत्राच्या प्रारंभी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून सदर प्रशिक्षणास शुभेच्छा दिल्या.
श्री लिलाई डिजीटल कम्युनिकेशन लि. यांच्या वतीने श्री.प्रणवकुमार भदाणे आणि श्री.चारुहास भदाणे यांनी शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमांचा सुलभतेने व दक्षतेने कसा वापर करावा या विषयावर प्रात्यक्षिकासह तांत्रिक मार्गदर्शन केले. संगणक आणि मोबाईलचा उपयोग करतांना सुरक्षितता असणे कसे आवश्यक आहे. या सोबतच अधिकाधिक लोकांच्या समोर जातांना कोणती नवमाध्यमे उपयुक्त ठरतील. याबाबतही माहिती त्यांनी दिली. यावेळी ऑनलाईन सहभागी असणारे अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांना प्रत्यक्ष कामात येणाऱ्या अडचणीबाबत प्रश्नोत्तरे केली.
प्रशिक्षणाच्या प्रारंभी उपसंचालक (माहिती) कोकण विभाग डॉ.गणेश मुळे यांनी प्रास्ताविक केले. तर सहाय्यक संचालक (माहिती) श्री.नंदकुमार वाघमारे यांनी आभार मानले. ऑनलाईन प्रशिक्षण सत्रासाठी विभागात समन्वयाचे काम माहिती सहाय्यक श्री.प्रविण डोंगरदिवे यांनी पाहिले.