गणेशोत्सवासाठी देणगी घेताना परवानगी घेणे आवश्यक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑगस्ट २०२३ | सातारा |
मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ४१ (क) नुसार धार्मिक व सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करावयाची असल्यास सहायक धर्मादाय आयुक्त, सातारा यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय सार्वजनिक उपक्रमास निधी जमा करणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. असे आढळल्यास कलम ६६ व ६७ नुसार फौजदारी कारवाईची तरतूद आहे, याची सातारा जिल्ह्यातील सर्व गणेशत्सव मंडळानी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाकय धर्मादाय आयुक्त सी.एम. ढबाले यांनी केले आहे.

गणेशत्सव परवानगीचे आवश्यक अर्ज धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहे. २०२३ सालातील तात्पुरत्या स्वरूपातील परवानगी देण्याचे काम दि. २५ ऑगस्ट २०२३ पासून कार्यालयात सुरू करण्यात येणार आहे. संस्था नोंदणी अधिनियम, १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अन्वये नोंद असलेल्या व ज्यांच्या उद्देशामध्ये गणेश उत्सव साजरा करणे असा उल्लेख असणार्‍या संस्थांना अशी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तसेच तात्पुरत्या स्वरूपातील परवानगीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे नवीन परवानगीसाठी अर्ज करतेवेळी त्या त्या क्षेत्रातील नगरसेवक, ग्रामपंचायतीकडील त्यांचे ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यास अनुमती असल्याचे संमती पत्रक सादर करणे आवश्यक आहे. सन २०२३ मधील सार्वजनिक गणेशत्सवासाठी निधी गोळा करण्यासाठी परवानगीचे देण्याचे काम १९ सप्टेंबर अखेर चालू राहणार आहे.

देगणीदारांनी देणगी देण्यापूर्वी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडील परवानगीची प्रत पाहून खात्री करून देणगी, वर्गणीबाबत निर्णय घ्यावा. तसेच सर्व गणेशोत्सव मंडळाच्या संबंधीत पदाधिकार्‍यांनी मागणीप्रमाणे देणगी, वर्गणी स्वीकारणेपूर्वी परवाना दाखविण्याची व देणगी, वर्गणी मिळालेबाबतची आवश्यक ती पावती देण्याची खबरदारी घ्यावी, असेही आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती ढबले यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!