Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.

दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑकटोबर २०२२ । मुंबई । दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते.

दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी (26/11) मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष तथा गॅबॉन प्रजासत्ताक देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मायकल मौस्सा अडामो प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत श्रीमती रूचिरा कंबोज यांनी केले.

भारत 2022 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचा अध्यक्ष आहे. या समितीमध्ये सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्रसंघाच्या 15 देशांतील राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची दोन दिवसीय बैठक भारतात होत आहे. उद्या दिल्ली येथे बैठक आहे. मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे बैठक झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीने ‘दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी लढा’ या विषयावर अनौपचारिक चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. यात स्थानिक आणि क्षेत्रीय पातळीवरील उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाली.

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर म्हणाले, दहशतवाद विरोधात लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. दहशतवाद आणि त्यांच्या प्रायोजकांविरुद्ध ठोस कारवाई करावी लागेल. दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने, प्रशिक्षण स्थळे शोधून त्यांना असलेले राजकीय समर्थन आर्थिक आणि वैचारिक संरक्षण नष्ट करणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांत, दहशतवादी गटांनी त्यांना मिळत असलेल्या मिळकतीच्या पद्धतीमध्ये  विविधता आणली आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. वित्तपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या अनामिकतेचा फायदा घेऊन व्हर्च्युअल चलने वापरून निधी उभारणी सुरु केली आहे. या संदर्भात, अधिक विचारमंथन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला विचारात घेऊन नाविन्यपूर्ण उपाय योजण्यासाठी उद्या नवी दिल्ली येथे होणाऱ्या समितीच्या विशेष बैठकीत चर्चा होईल, अशी अपेक्षा डॉ. जयशंकर यांनी व्यक्त केली.

दहशतवादविरोधी लढाई सामूहिकपणे लढणे गरजेचे

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दहशतवादविरोधी लढाई ही सर्वांनी एकत्रितपणे आणि एकजुटीने लढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केले. या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीची महत्वपूर्ण परिषद मुंबईत झाली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी ज्या ताजमहाल हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला तेथे या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल संयुक्त राष्ट्र समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना त्यांनी मनापासून धन्यवाद दिले.

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या सुरक्षेविषयी महत्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांसह सर्व राज्याचे गृहमंत्री उपस्थित असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी यावेळी दिली.

26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

सुरूवातीला दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत (26/11) झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. गॅबॉन प्रजासत्ताकचे परराष्ट्र मंत्री तथा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष मायकेल मौस्सा अडामो यांच्यासह भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्षा आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत रूचिरा कंबोज यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!